जर तुम्ही घरबसल्या ईपीएफ क्लेमसाठी ऑनलाइन अर्ज केला असेल आणि तुमचा हा दावा पुन्हा पुन्हा नाकारला जात असेल, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण या कर्मचाऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. यासाठी EPFO ने प्रादेशिक कार्यालयांना एक नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. जेणेकरून आता तुमचा क्लेम वारंवार फेटाळला जाणार नाही. ईपीएफओने प्रादेशिक कार्यालयांना एक मार्गदर्शक सूचना जारी केली असून ईपीएफसाठी केल्या जाणार्या ऑनलाइन क्लेमबाबत लवकरात लवकर प्रक्रिया करावी आणि एकदा केलेला हा क्लेम अनेक कारणांनी नाकारला जाऊ नये, असेही या मार्गदर्शक सूचनेत म्हटले आहे.
(हेही वाचा – मुंबईत बनावट आधार, पॅन कार्ड बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! एकाला बेड्या)
ईपीएफओच्या या मार्गदर्शक सुचनेनंतर, कर्मचाऱ्याने केलेला क्लेम वारंवार रिजेक्ट जाणार नाही अशी अपेक्षा आहे. ईपीएफओने म्हटले आहे की, प्रत्येक क्लेमची प्रथमतः सखोल चौकशी केली जावी आणि नाकारण्याचे कारण पहिल्यांदा कर्मचाऱ्याला कळवावे. अनेकदा तोच क्लेम वेगवेगळ्या कारणांनी रिजेक्ट केला जात असल्याचे तपासात आढळून आले आहे.
प्रादेशिक कार्यालयांनी देखील अशाच प्रकारचे पीएफ क्लेम रिजेक्ट केल्याचा अहवाल परिमंडळ कार्यालयाकडे पुनर्विलोकनासाठी पाठवणे आवश्यक आहे, जेणेकरून अपेक्षित वेळेत प्रक्रिया केली जाईल. दरम्यान, सदस्यांच्या तक्रारी आणि होणाऱ्या गैरप्रकारांमुळे सदस्यांना योग्य लाभ सेवा मिळण्यात विलंब होतो, ज्यामध्ये अनावश्यक कागदपत्रे मागवणे इत्यादी कारणांचा समावेश आहे.
ईपीएफओने केलेल्या विभागीय चौकशीत असे निदर्शनास आले की, अनेक प्रकरणांमध्ये क्लेम एका विशिष्ट कारणास्तव रिजेक्ट गेले आणि जेव्हा ते दुरुस्त केल्यानंतर पुन्हा सादर केले गेले, तेव्हा ते इतर/वेगळ्या कारणांमुळे पुन्हा रिजेक्ट करण्यात आले. सर्व जबाबदार अधिकार्यांनी कोणताही क्लेम रिजेक्ट केला जाणार नाही याची काळजी घ्यावी आणि ईपीएफ कर्मचार्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, कारण नसताना जाणूनबुजून क्लेम रिजेक्ट केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही ईपीएफओने म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community