EPFO: PF बॅलन्स तपासताय? ‘या’ नंबरवर कॉल केला तर होईल लाखोंची फसवणूक

केंद्र सरकारने पीएफ धारकांच्या खात्यावर पीएफचे व्याज जमा करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता पीएफ धारकांना व्याजाचे पैसे मिळण्याची आशा असल्याने पीएफ धारक आपल्या पीएफचा अकाऊंट बॅलन्स तपासत आहेत. त्यासाठी EPFO च्या अधिकृत वेबसाईटवर किंवा सरकारच्या उमंग अॅपद्वारे पीएफचा अकाऊंट बॅलन्स तपासता येतो.

पण अलीकडेच एका व्यक्तीला पीएफचा बॅलन्स तपासणे महागात पडले असून त्याची 1.23 लाख रुपयांना फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पीएफ बॅलन्स तपासताना काळजी घेण्याची गरज आहे.

पीएफ धारकाची फसवणूक

अंधेरीतील एका 47 वर्षीय पीएफ धारकाने आपला पीएफ बॅलन्स तपासण्यासाठी EPFO च्या कस्टमर केअरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला कस्टमर केअर नंबर माहीत नसल्यामुळे त्याने गुगलवर नंबर शोधण्याचा प्रयत्न केला असता त्याला EPFO चा बनावट कस्टमर केअर नंबर मिळाला, जो स्कॅमर्सच्या माध्यमातून अपलोड करण्यात आला होता. त्यानंतर या नंबरवरुन पीएफ धारकाची फसवणूक करण्यात आली.

काय झाले नेमके?

या नंबरवर फोन केला असता स्कॅमर्सनी पीएफ धारकाला एक रिमोट अॅक्सेस अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. हे अॅप डाऊनलोड करताच व्यक्तीच्या पीएफ खात्यातून 14 वेगवेगळे व्यवहार करुन तब्बल 1.23 लाख रुपये काढण्यात आले. त्यामुळे जर का आपल्यालाही पीएफचा अकाऊंट बॅलन्स तपासायचा असेल तर EPFO च्या अधिकृत वेबसाईटवरुन किंवा सरकारच्या संबंधित अएफवरुन ही माहिती मिळवणे आवश्यक आहे, असे आवाहन करण्यात येत आहे. जेणेकरुन आपल्यालाही अशा फसवणुकीला बळी पडावे लागणार नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here