-
ऋजुता लुकतुके
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून खातेदार ॲडव्हान्स्ड क्लेम म्हणून लवकरच १ लाख रुपयांऐवजी ५ लाख रुपये काढू शकणार आहेत. तसा प्रस्ताव केंद्रसरकारच्या विचाराधीन आहे. एएनआय (ANI) वृत्तसंस्थेनं सरकारी सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. लवकरच याविषयी अधिकृत घोषणा होईल असंही बातमीत म्हटलं आहे. गेल्या आठवड्यातच ईपीएफओ (EPFO) मध्यवर्ती विश्वस्त मंडळाची एक बैठक झाली होती. यात पैसे काढण्याच्यी मर्यादा वाढवण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय श्रम व रोजगार मंत्रालयाच्या सचिव सुनिता दावरा यांनी मान्यता दिल्याचं बोललं जात आहे.
२८ मार्च रोजी श्रीनगर इथं ही बैठक झाली होती. या बैठकीला ईपीएफओचे प्रोव्हिडंड फंड आयुक्त रमेश कृष्णमूर्तीही हजर होते. सध्या हा प्रस्ताव स्वरुपात आहे. आणि त्यावर केंद्रीय ईपीएफओ विश्वस्त मंडळाची मान्यता लागणार आहे. ईपीएफओने (EPFO) एप्रिल २०२० मध्ये कोरोना काळात फंडातील रक्कम काही प्रमाणात काढून घेण्याची सोय पहिल्यांदा उपलब्ध करून दिली. त्यावेळी खातेदारांना ५०,००० रुपयांपर्यंतची रक्कम ॲडव्हान्स म्हणून काढून घेता येणार होती. आजारपण किंवा तशाच कुठल्याही महत्त्वाच्या कारणासाठी ही रक्कम काढून घेण्याची मुभा होती. त्यानंतर मे २०२४ मध्ये ही मर्यादा वाढवून १ लाख रुपये करण्यात आली.
(हेही वाचा – मोदींनी कधी निवृत्त व्हावं हे जनता ठरवेल, सकाळचा भोंगा नाही; Chandrashekhar Bawankule यांचा राऊतांना टोला)
ईपीएफओ (EPFO) खात्यातील रक्कम सुरुवातीला फक्त आजारपण आणि रुग्णालयात दाखल झाल्यावरच काढून घेता येत होती. पण, त्यानंतर ईपीएफओ (EPFO) कार्यालयाने शिक्षण, लग्न व ङऱ खरेदी ही तीन कारणं समाविष्ट केली. ईपीएफओ क्लेम नाकारला जाण्याचं प्रमाण आता ५० टक्क्यांवरून ३० टक्क्यांवर आलं आहे, असा दावा ईपीएफओच्या (EPFO) बैठकीत करण्यात आला.
ईपीएफओ (EPFO) कार्यालयाने अलीकडे आपलं बरंचसं काम ऑनलाईन पद्धतीने सुरू केलं आहे. केवायसी (KYC) प्रक्रिया पूर्ण केली असेल तर पैसे काढण्याची प्रक्रियाही ऑनलाईन करता येते. त्यामुळे पैसे खात्यात जमा होण्याचा कालावधीही कमी झाला आहे. आता ३ ते ४ दिवसांत पैसे तुमच्या खात्यात जमा होतात. यापूर्वी हा कालावधी १० दिवसांचा होता.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community