राज्यातील रुग्णांना उपचार देणारी ई-संजीवनी बंद

नागरिकांना आरोग्यविषयक सल्ला मिळण्यासाठी राज्यात ई-संजीवनी राज्य आरोग्य विभागाने सुरु केली आहे. संकेतस्थळाच्या माध्यमातून रुग्णांना दिली जाणा-या माहितीचे काम सांभाळणा-या राज्यातील समुदाय आरोग्य अधिका-यांनी आता ही सेवा देणे बंद केले आहे. प्रलंबित पगारवाढ तसेच बदल्यांच्या मागण्यांवरुन बुधवारी, 1 फेब्रुवारी महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेच्यावतीने समुदाय आरोग्य अधिका-यांनी एकदिवसीय लक्षवेधी आंदोलनाचे आयोजन केले होते. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याकडून चर्चेला आमंत्रण आल्यानंतर सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यासच ई-संजीवनी तसेच प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील रुग्णांच्या तांत्रिक माहितीत डॉक्टर्स सहभागी होतील, अशी कडक भूमिका समुदाय आरोग्य अधिका-यांच्यावतीने घेण्यात आली. बेमुदत संपाबाबत गुरुवारी, २ फेब्रुवारी रोजी जाहीर भूमिका घेतली जाईल, असे संघटनेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.

केवळ ९ हजार डॉक्टर्स कार्यरत

राज्यातील दहा हजार प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील तब्बल ९ हजार समुदाय आरोग्य अधिका-यांनी बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. उपकेंद्रात रुग्णसेवेसाठी सध्या परिचारिका उपलब्ध असल्याने बुधवारी एकदिवसीय आंदोलनाचा संमिश्र परिणाम जाणवला. गुरुवारी डॉ. तानाजी सावंत यांच्या भूमिकेवर बेमुदत आंदोलनाची दिशा ठरेल, असेही संघटनेच्यावतीने सांगण्यात आले. दहा हजारांहून अधिक जागांवर आता प्रत्यक्षात केवळ ९ हजार डॉक्टर्स कार्यरत आहेत. पगारवाढ नसताना काही खासगी कारणांमुळे गरजेच्या भागांत बदल्याही नाकारल्या जात असल्याचा आरोप डॉक्टरांनी केला. याविरोधात १६ जानेवारीलाही एकदिवसीय आंदोलन केले होते. त्यानंतरही वरिष्ठांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने यंदाच्यावर्षांत आम्ही दोनवेळा एकदिवसीय आंदोलन केले. आता निर्णायक भूमिकेबाबत आम्ही ठाम आहोत. बेमुदत संपाबाबत गुरुवारी जाहीर भूमिका घेतली जाईल, असे संघटनेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.

(हेही वाचा श्रीरामाची मूर्ती घडवण्यासाठी शालीग्राम शीळा अयोध्येत दाखल )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here