मानवाचा विकास, तसेच समाजाची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी शिक्षण आणि आरोग्य या दोन बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत जितक्या सहजतेने शिक्षण पोहोचेल, तेवढ्या गतीने समाजाची प्रगती होते. नागरिकांचे आरोग्य हा देखील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. शिक्षण व आरोग्य हे मानवी जीवनातील अविभाज्य घटक आहेत. म्हणूनच जिल्ह्यात दर्जेदार शैक्षणिक व्यवस्थेसह उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा निर्माण करायला हव्या, अशी अपेक्षा राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आणि चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.
(हेही वाचा – Skills Training for Beggars : आता भिकाऱ्यांना मिळणार कौशल्य विकासाचे धडे)
शनिवारी चंद्रपूर येथे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन, तसेच डॉ. झाकीर हुसेन उर्दू प्राथमिक शाळेच्या नूतनीकरण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला महानगरपालिकेचे आयुक्त विपिन पालीवाल, उपायुक्त अशोक गराटे, मंगेश खवले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आविष्कार खंडाळे, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार, झाकीर हुसेन उर्दू शाळेचे मुख्याध्यापक श्री. शहजाद, राहुल पावडे, मंगेश गुलवाडे, सुभाष कासनगोट्टूवार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, आझाद गार्डन येथे राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत व्हॅक्युम असेस रोड स्वीपर ही अत्याधुनिक मशीन मनपाच्या माध्यमातून स्वच्छतेसाठी, तर शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही फॉगर मशीन यासाठी 49 लक्ष 35 हजार रुपये खर्च करून उपलब्ध करून देण्यात आली आहे. वाढते प्रदूषण, रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे निर्माण झालेले विषारी अन्न यामुळे माणसाचे आरोग्य बिघडू लागले आहे. यावर उपाय म्हणून राज्य सरकारने काही महत्त्वपूर्ण निर्णय केले आहेत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने 700 ठिकाणी “आपला दवाखाना” महाराष्ट्रात सुरू करण्यात आले आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत उत्पन्नाची मर्यादा 1 लक्ष 50 हजार होती. आता विमा कवच 5 लक्ष्यापर्यंत वाढविण्यात आली. या योजनेत 5 लाखांमध्ये साधारणतः 900 पेक्षा जास्त आजारांचे ऑपरेशन पूर्ण केल्या जात असल्याचेही ते म्हणाले. विश्वगौरव प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 50 कोटी लोकांसाठी आयुष्यमान भारत योजना निर्माण केली.
जिल्ह्यात अपघात, तसेच विविध कारणांमुळे दिव्यांग मोठ्या प्रमाणात वाढले. त्यामुळे दिव्यागांना मदतीचा हात पुढे केल्यास, समाजाची काळजी एकमेकांच्या मदतीने घेता येईल. या आरोग्यवर्धिनी केंद्रात येणाऱ्या रुग्णांच्या चेहऱ्यावर वेदना तर जाताना सुख व समाधान घेऊन जाईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. भारताची खरी संपत्ती ही योगा आहे. या संपत्तीचा उपयोग नागरीकांनी केल्यास दवाखान्यात जाण्याची गरज भासणार नाही असेही ते म्हणाले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community