राज्यात दूध व दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळीला पायबंद घालण्यासाठी दुग्धव्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जिल्हास्तरीय समिती गट करण्याविषयी सूचित केले होते. त्याप्रमाणे ठाणे जिल्ह्याच्या जिल्हास्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे.
शासनाच्या निर्णयाप्रमाणे या समितीअंतर्गत दूध व दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी धडक तपासणी मोहीम हाती घेणे, दूध व दुग्धजन्य पदार्थ भेसळीत सहभागी असणाऱ्या व्यक्ती आणि आस्थापना यांच्या विरोधात तक्रार दाखल करून कारवाई करण्यात येणार आहे तसेच दूध भेसळ करणाऱ्या व्यक्तीबरोबर भेसळयुक्त दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ स्वीकारणाऱ्या व्यक्ती आणि आस्थापने यांच्यावरही सहआरोपी म्हणून कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे भेसळ करणाऱ्यांना सावध राहण्याची आवश्यकता आहे अन्यथा प्रशासनाच्या कारवाईला सामोरे जावे लागू शकते.
(हेही वाचा – Pune Lok Sabha Constituency : लोकसभेला पुण्यातून सुनील देवधर यांना उमेदवारी?)
दुग्धव्यवसाय विभागातील सचिव तुकाराम मुंडे यांनी राज्यस्तरीय बैठकीत सूचना दिल्या आहेत की, सणांच्या पार्श्वभूमीवर समितीने दूध व दुग्धजन्य पदार्थ या विषयाकडे अतिशय गांभीर्याने पाहावे. यामध्ये भेसळ करणारे दुकानदार आणि व्यावसायिकांवर कडक कारवाई करावी. जनतेला भेसळमुक्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थ मिळणे ही दुकानदार आणि व्यावसायिकांची जबाबदारी आहे.
या दृष्टीने ठाणे जिल्हास्तरीय समितीने धडक कारवाई सुरू केली असून समितीने शहापूर तालुक्यात तीन ठिकाणी दूध तपासणी केली. त्याचबरोबर जिल्ह्यातील दुग्ध व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे की, दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या बाबतीत भेसळ आढळल्यास संबंधित व्यक्ती आणि आस्थापनाविरोधात तात्काळ एफआयआर नोंदवून अत्यंत कडक कारवाई करण्यात येईल तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या बाबतीत भेसळ आढळल्यास तात्काळ दुग्ध व्यवसाय समितीकडे तक्रार करावी, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या जिल्हास्तरीय समितीच्या अध्यक्षा अतिरिक्त जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे असून या समितीत अपर पोलीस अधीक्षक, सहाय्यक आयुक्त (अन्न) अन्न व औषध प्रशासन, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, उपनियंत्रक, वैधमापन शास्त्र हे सदस्य तर जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी दीपक खांडेकर हे सदस्य सचिव आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community