मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. पहिल्या दोन लाटेप्रमाणे सध्या असलेला कोरोना व्हेरियंट घातक नाही मात्र मागील काही दिवसांत शहरात आढळलेल्या कोराेना रुग्णांमध्ये तीन नवे व्हेरियंट आढळले आहेत. यापूर्वी हेच व्हेरियंट युरोप, अमेरिकेत आढळले आहेत. नविन व्हेरीएंटमुळे घाबरण्याचे कारण नाही, मात्र प्रत्येकाने सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचे कोविड-१९ विषाणू तपासणी प्रयोगशाळेचे नोडल अधिकारी डॉ. प्रशांत ठाकरे यांनी सांगितले. दरम्यान महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात युरोप, अमेरिकेत आढळलेले कोरोनाचे व्हेरियंट आढळले आहेत.
अमरावती जिल्ह्यात सध्या वातावरण बदलामुळे सर्दी, खोकला, ताप आजाराच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहेत. यातच जिल्ह्यात आतापर्यंत ‘एच३ एन२’ चे पाच रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी दोन रुग्णांना सुटी देण्यात आली असून, तीन रुग्णांवर इर्विन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याचवेळी कोरोनाचे ३५ रुग्ण सक्रिय आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांनी दिली आहे.
सध्या जिल्ह्यात ३५ कोरोना रुग्ण सक्रिय असून त्यांची लक्षणे सौम्य असल्याने त्यांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे. परंतु रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली तर खबरदारी म्हणून जिल्हा आरोग्य प्रशासनाने इर्विन रुग्णालयात आयसोलेशन वाॅर्डची तयारी केली आहे. सध्या याच वॉर्डमध्ये ‘एच३ एन२’चे रुग्ण उपचार घेत आहेत.
४७ नमुन्यांची केली एनआयव्हीमध्ये तपासणी
१७ फेब्रुवारी २०२३ पासून शहर व जिल्ह्यात कोविड पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपैकी ४७ नमुने तपासणीसाठी ‘एनआयव्ही’ पुण्यात पाठवले होते. त्यापैकी एका नमुन्यामध्ये एक्सबिडी.१ व्हेरीएंट आढळला.
(हेही वाचा – रेशनकार्ड धारकांसाठी गुड न्यूज; ‘आनंदाचा शिधा’चे वितरण महिनाभर सुरू राहणार)
Join Our WhatsApp Community