मुंबईत कोविडनंतरही दोन हजार मंडळांचे उत्सव झाले बंद

138

मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या वाढत असली तरी यंदा मात्र अनेक उत्सव मंडळांना परवानगी न मिळाल्याने बाप्पांचे आगमन होऊ शकणार नाही, अशी भीती वर्तवली जात होती. मात्र, प्रत्यक्षात बाप्पांची प्रतिष्ठापना झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जित मूर्तींच्या आकडेवारीनुसार यंदा कोविड पूर्वीच्या उत्सवाच्या तुलनेत यंदा तब्बल २ हजार ६६ मूर्तींची प्रतिष्ठापन झालेली नाही. अर्थात यंदा दोन हजारांहून मंडळांनी यंदा उत्सवच साजरा केला  नसल्याची माहिती समोर आली आहे.

२०१९ मध्ये १२ हजार ०३३ मंडळांनी मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली

मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महापालिकेसह स्थानिक पोलीस आणि वाहतूक पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे सार्वजनिक उत्सवाकरता महापालिकेकडे एकूण ३,४८७ अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील ५६२ अर्ज डुप्लिकेट असल्याने छाननी अंती  २,९२५ अर्जांपैकी २,२८२ अर्जांना मंजुरी देण्यात आली होती, तर ४९१ अर्ज फेटाळण्यात आले होते. महापालिकेची परवानगी घेतलेल्या मंडळांच्या तुलनेत प्रत्यक्षात यंदा ९,९६७  मंडळांनी गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली. त्यामुळे मंजुरीच्या तिप्पट गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना झाल्याचे पहायला मिळत आहे. कोविड पूर्वी म्हणजे २०१९ मध्ये संपूर्ण मुंबईत १२ हजार ०३३ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. परंतु कोविडच्या पहिल्या लाटेमध्ये कडक  निर्बंधामुळे सन २०२० मध्ये केवळ ६,६४३ सार्वजनिक गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना होऊ शकली, तर त्यापुढील दुसऱ्या लाटेमध्ये अर्थात सन २०२१ मध्ये ८,०४९ एवढ्या गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना झाली होती.

(हेही वाचा मुंबईत यंदा बाप्पा वाढले : तब्बल २८ हजार ९३३ पेक्षा अधिक गणेश मूर्तींची झालेली प्रतिष्ठापना)

घरगुती गणपतींची संख्या वाढली

कोविडच्या पहिल्या लाटेमध्ये सार्वजनिक उत्सव मंडळांच्या मूर्तींची संख्या निम्म्यावर आली होती. त्यानंतर सन २०२१मध्ये ही संख्या १४०० ने वाढली होती आणि आता ही संख्या दोन हजारांनी वाढल्याचे विसर्जित मूर्तींच्या आकडेवारींवरून स्पष्ट होत आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाबरोबरच घरगुती गणपतींची संख्या ही सन २०१९च्या तुलनेत कोविडमध्ये कमी झाल्यानंतर वाढताना दिसत आहे. मात्र, कोविड पूर्वीची मूर्तींची संख्या पाहता यंदा झालेल्या मूर्तीच्या आकडेवारीनुसार ही संख्या २७६२ने वाढल्याचे पहायला मिळाले आहे. तर सन २०२१ मध्ये घरगुती : १,५०,४५४, सन २०२० मध्ये घरगुती : १,२४,९३०, सन २०१९मध्ये घरगुती १,७९,०६२ मूर्तींची प्रतिष्ठापना झाली होती.

एकूण प्रतिष्ठापना झालेल्या आणि विसर्जन झालेल्या मूर्तींची संख्या

  • सन २०२२ :  १ लाख ९३ हजार ०६२ (सार्वजनिक :९,९६७ )
  • सन २०२१ :  १ लाख ६४ हजार ७६१ (सार्वजनिक : ८,०४९)
  • सन २०२० :  १ लाख ३५ हजार ५१५ (सार्वजनिक : ६,४४३)
  • सन २०१९ :  १ लाख९६ हजार ४८३ (सार्वजनिक : १२,०३३ )
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.