मुंबईतील प्रकल्पांमध्ये बाधित होणाऱ्या कुटुंबांना पर्यायी घरे उपलब्ध करून दिली जातात. मात्र, प्रकल्पबाधित कुटुंब या पर्यायी घरांचा ताबा घेतल्यानंतर पुन्हा अतिक्रमण करून झोपडी बांधून राहत असल्याचे प्रकार मुंबईतील अनेक ठिकाणी आढळून येत आहेत.
अशाच प्रकारे रेल्वेच्या मार्गात बाधित होणाऱ्या कुटुंबांचे पुनर्वसन करण्यासाठी एमएमआरडीने बाधितांना सदनिकांचे वाटप केल्यानंतरही तब्बल १७ कुटुंबांनी रस्त्यासाठी आरक्षित असलेली मोकळी जागा अडवून ठेवली होती. विक्रोळी पूर्व येथील ही घटना असून या सर्व कुटुंबांना हटवून स्थानिकांना चांगल्या प्रकारचा विकास नियोजन रस्ता आता खुला करून देण्यात येत आहे.
(हेही वाचाः ही ठाकरे सरकारची ‘तोडफोड’शाही?)
होत होती वाहतूक कोंडी
विक्रोळी (पूर्व) परिसरातील नामदेवराव पाटणे मार्ग या रस्त्यावरील विविध १७ गाळ्यांच्या पुढील बाजूस अवैध व वाढीव बांधकामे करण्यात आली होती. त्यामुळे या जागेवरून जाणा-या प्रस्तावित १८.३० मीटर रुंदीच्या विकास नियोजन रस्त्यांची जागा अडवली गेली होती. या अतिक्रमित आणि अवैध बांधकामामुळे या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम रखडले गेल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.
सदनिका मिळूनही अतिक्रमण
विशेष म्हणजे नामदेवराव पाटणे मार्गावरील या १७ गाळ्यांना मध्य रेल्वेच्या पाचव्या व सहाव्या मार्गिकेच्या विस्तारीकरणात बाधित होत असल्याने, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मार्फत पर्यायी सदनिका उपलब्ध करून दिल्या होत्या. मात्र, या सदनिकांचा ताबा मिळाल्यानंतरही या जागा पुन्हा अतिक्रमित करण्यात आल्या होत्या, असे या पाहणीमध्ये आढळून आले होते.
(हेही वाचाः महापालिकेची निवडणूक ऑक्टोबरमध्ये? सत्ताधारी पक्षानेच दिले ‘असे’ संकेत)
अखेर कारवाईचा बडगा
मुंबई महापालिकेच्या ‘एस’ विभागाने तीन वेळा नोटीस देऊन सुनावणीही घेण्यात आली होती. मात्र, यानंतरही संबंधितांनी अनधिकृत बांधकामे स्वतःहून न हटविल्याने या अवैध बांधकामावर सोमवारी तोडक कारवाई करण्यात आली आहे. ‘परिमंडळ ६’ चे उपायुक्त देवीदास क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनात व ‘एस’ विभागाचे सहायक आयुक्त अजितकुमार आंबी यांच्या नेतृत्वाखाली या १७ अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करून ही बांधकामे आता हटविण्यात आली आहेत.
यासाठी मुंबई पोलिस दलाची मदत महापालिकेच्या पथकाला झाली आहे. यामुळे संबंधित विकास नियोजन रस्त्याचे रुंदीकरण प्रत्यक्षात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या ‘एस’ विभागाचे सहायक आयुक्त अजितकुमार आंबी यांनी दिली आहे.
(हेही वाचाः आदित्य ठाकरेंमुळे राज्यातील पर्यटनक्षेत्र असे बहरले!)
Join Our WhatsApp Community