कोरोना १९ या लसींच्या साठवणुकीसाठी कांजुरमार्ग (पूर्व) येथील परिवार संकुलात अत्याधुनिक लस साठवणूक केंद्र निर्माण करण्यात आले असून या जागेवर अधिक २ डिग्री सेल्सियस ते अधिक ८ डिग्री सेल्सिअस तापमान राखत असलेले ४० क्युबिक मीटरची दोन (वॉक इन कुलर) बसविण्यात आले आहे. त्यासोबतच वजा १५ डिग्री सेल्सिअस ते वजा २५ डिग्री सेल्सिअस तापमान राखत असलेले २० क्युबिक मीटरचे (वॉक इन फ्रिझर) बसविण्यात आले आहे. या शीतगृहात मुंबईला आवश्यक असलेला कोविड १९ या लसीचा पुरेसा साठा ठेवण्याची क्षमता असून ही शीतगृहे सकाळी सौरऊर्जेवर व रात्री थेट वीज पुरवठ्यावर चालविण्यात येणार आहे. त्यामुळे अचानक वीज पुरवठा खंडित झाल्यास यासाठी प्रत्येक युनिट निहाय स्वतंत्र डीजे सेटची व्यवस्था करण्यात आली आहे.
महापौरांच्या हस्ते शीतगृहाचे उद्घाटन पार पडले!
मुंबई महानगरपालिकेच्यावतीने कांजुरमार्ग (पूर्व) येथील मामा मिराशी मार्गावरील परिवार बिल्डिंगमध्ये नव्याने तयार करण्यात आलेल्या लस साठवणूक केंद्रातील शीतगृहाचे उद्घाटन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याहस्ते फित कापून केले. हे उद्घाटन दुपारी एक वाजता होणार होते. परंतु भाजपच्या नगरसेविका या कार्यक्रमाला उपस्थित राहणार म्हणून महापौरांनी हा कार्यक्रम नियोजित वेळेपूर्वीच आटोपून घेतला. परंतु दुपारी एक वाजता हे उद्घाटन होणार असल्याने राज्याचे परिवहन मत्री अनिल परब हे तिथे पोहोचले. परंतु तोपर्यंत हा कार्यक्रम आटोपला होता आणि महापौर शीतगृहासह लसीकरण केंद्रात फेरफटका मारुन पाहणी करत होते. त्यामुळे अखेर अनिल परब हे नंतर कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांच्यासह आरोग्य अधिकाऱ्यांकडून लसीकरणाच्या साठवणुकीबाबत माहिती घेवून निघून गेले. या उद्धघाटन प्रसंगी आरोग्य समिती अध्यक्षा प्रवीणा मोरजकर, एस आणि टी विभागाच्या प्रभाग समिती अध्यक्षा दीपमाला बढे, स्थानिक नगरसेविका सुवर्णा करंजे, नगरसेविका सर्व सारिका पवार, जागृती पाटील, वैशाली पाटील, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, सहाय्यक आरोग्य अधिकारी (लसीकरण विभाग) डॉ. शीला जगताप, डॉ. अविनाश अंकुश तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम आटोपताच भाजपच्या नगरसेविका निघून गेल्या.
(हेही वाचा : कोरोनाला रोखण्यासाठी निर्बंध… काय म्हणाले मुख्यमंत्री?)
केंद्राची लस साठवणूक क्षमता ही १ कोटी २० लाख एवढी
कोविड १९ लसीकरणाच्या साठ्यासाठी तयार करण्यात आलेले लस साठवणूक केंद्र हे आगामी पन्नास वर्षांची गरज पूर्ण करणारे लस साठवणूक केंद्र झाले असल्याचे यावेळी महापौर किशोर पेडणेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना स्पष्ट केले. या लस साठवणूक केंद्राची लस साठवणूक क्षमता ही १ कोटी २० लाख एवढी आहे. बाहेरील वातावरणाचा लसींवर कुठल्याही प्रकारे परिणाम होऊ नये, यासाठी या जागेवर अधिक २ डिग्री सेल्सियस ते अधिक ८ डिग्री सेल्सिअस तापमान राखत असलेले ४० क्युबिक मीटरचे दोन उपकरणे बसविण्यात आले आहे असल्याची माहिती दिली. अत्यंत अल्प कालावधीमध्ये मुंबई महानगरपालिकेने हे लस साठवणूक केंद्र तयार केले असल्याचे सांगून यासाठी कार्यरत असलेल्या संबंधित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले. ०७ एप्रिल ‘जागतिक आरोग्य दिन’ रोजी हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आनंद होत असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या.
Join Our WhatsApp Community