मुंबई महापालिका शाळांमधील शालेय साहित्य वाटपाला झालेल्या विलंबाची जोरदार चर्चा सुरु असतानाच विद्यार्थ्यांच्या गणवेशही आता निविदेतच अडकले गेले आहे. शाळा सुरु झाल्या असल्या तरी मुलांना गणवेश मिळणार नसून येत्या सप्टेंबर महिन्यानंतरच नवीन गणवेश मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. फेब्रुवारी महिन्यात निविदा प्रक्रिया सुरु झाली असली तरी मे महिन्यामध्ये गणवेशाचा रंग बदलण्यात आल्याने निविदेला विलंब झाला आहे.त्यामुळे मुलांना आता जुना नाहीतर, तोकडा,फाटका गणवेष परिधान करूनच शाळेत लागत आहे. केवळ युवराजांची मर्जी राखण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरु झाल्यानंतर बदलेल्या गणवेशाची अट घालण्यात आल्याने हा विलंब झाल्याचे बोलले जात आहे.
शालेय साहित्य लवकरच विद्यार्थ्यांना दिले जाणार
मुंबई महापालिका शाळांमधील मुलांना २७ शालेय वस्तूंचे मोफत वाटप करण्याचा निर्णय २००७पासून घेण्यात आला आहे. तेव्हापासून महापालिका शाळांमध्ये मोफत साहित्यांचा वाटप करण्यात येत असून मागील तीन ते चार वर्षांपासून शाळेच्या पहिल्याच दिवशी हे सर्व साहित्य मुलांना दिले जायचे. परंतु कोविडनंतर शाळा सुरु झालेल्या असताना पहिल्याच वर्षी शालेय साहित्य उशिराने वाटप केले जात आहे. आतापर्यंत शालेय स्टेशनरी, वह्या तसेच रेनकोट आदींचे प्रस्ताव प्रशासकांनी मंजूर केले आहे. त्यामुळे या तिन्ही मंजूर प्रस्तावातील शालेय साहित्य लवकरच विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे.
या सर्व शालेय वस्तूंसाठी फेब्रुवारी महिन्यात निविदा मागवण्यात आली होती. परंतु २० जून उजाडला तरी अद्यापही या शालेय वस्तू मुलांना वितरीत करण्यात आलेल्या नाहीत. मुलांना शालेय वस्तू देण्यात येत असल्या तरी दप्तराचा अद्याप पत्ता नाही, त्यामुळे मुलांनी शालेय साहित्य कसे न्यावे असा प्रश्न उपस्थित होणार आहे. परंतु या मुलांना अद्यापही गणवेशही दिले गेले नसल्याची माहिती मिळत आहे. गणवेशासाठी फेब्रुवारी महिन्यात निविदा मागवण्यात आली होती. ही निविदा मागवल्यानंतर मे महिन्यांमध्ये गणवेशाचा रंग आणि डिझाईन बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. युवा नेते आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंनी या गणवेशाचा रंग आणि डिझाईन बदलण्याची सूचना केली होती आणि शिक्षण विभागाच्या सहआयुक्तांसह अधिकाऱ्यांनी शिक्षण विभागाकडून अशाप्रकारचे डिझाईन बनवून आदित्य ठाकरेंकडे मंजुरीसाठी पाठवले. त्यानंतर त्यांच्या सहमतीनंतर गणवेशाचे डिझाईन बदलून त्याप्रमाणे गणवेशाच्या कपड्याचा रंग बदलण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे निविदा प्रक्रियेला विलंब झाल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निविदा प्रक्रिया पूर्ण न झाल्याने अद्यापही मुलांना गणवेशाचे वाटप होऊ शकले नाही. जर गणवेशाची डिझाईन बदलली नसती, तर मुलांना एव्हाना हे गणवेश वितरीत करता आले असते आणि मुले नवीन गणवेश घालून शाळेत आले असते. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षापासून या नवीन डिझाईनच्या गणवेशचा समावेश करता आला असता, परंतु मंत्री महोदयांची मर्जी राखण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरु झाल्यानंतर हा बदल करण्यात आल्याने अर्धे शैक्षणिक वर्ष जुने कपडे घालून आणि पुढील शैक्षणिक वर्ष हे नवीन कपडे घालून जावे लागणार आहे.
याबाबत मध्यवर्ती खरेदी खात्याचे उपायुक्त रमाकांत बिरादर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शालेय वस्तू खरेदीच्या निविदांना कोरोनामुळे विलंब झाला आहे. कोविडमुळे शाळा सुरु होतील का याबाबत साशंकता असल्याने प्रक्रिया लांबली गेली होती, परंतु त्यानंतर ही प्रक्रिया राबवली गेली. गणवेशाबाबतचे डिझाईन बदलले गेले. परंतु सध्या याबाबतची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी घेऊन नवीन डिझाईनचे गणवेश वितरीत केले जातील,असे त्यांनी स्पष्ट केले.
Join Our WhatsApp Community