दादरमधील भागोजी किर स्मशानभूमीत दररोज दहा हजारांहून अधिक लिटर पाणी जाते वाया

दादर चैत्यभूमीवरील भागोजी किर स्मशानभूमीच्या देखभाल आणि दुरुस्तीवर दुर्लक्ष केले जात असून मागील पाच महिन्यांपासून याठिकाणी दरदिवशी दहा हजार लिटर पाणी वाहून जात आहे. स्मशानभूमीत अंत्यविधी आणि धार्मिक विधीसाठी येणाऱ्या नागरिकांना आंघोळीसह हातपाय धुण्यासाठी तसेच वापरासाठी पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून पाच हजार लिटर क्षमतेच्या तीन टाक्या बसण्यात आल्या आहेत. परंतु यातील एक टाकी फुटलेली असून यात भरणारे पाणीही वाहून जाते आणि वाहून जाणारेही. याशिवाय अन्य तीन टाक्यांमधून वाहून जाणारे पाणी बंद करण्याची प्रणाली नसल्याने रात्री दहा वाजेपर्यंत यातील पाणी वाहून जात असून सुमारे फुटलेल्या टाकीसह अन्य वाहून जाणाऱ्या टाक्यांमधून सुमारे दहा हजार लिटर पाणी वाहून जात असतानाही महापालिकेच्या जी उत्तर विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह देखभाल व दुरुस्ती विभागाच्या अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

( हेही वाचा : संजय राऊतांच्या अडचणीत वाढ; १८ नोव्हेंबरला ईडीकडून पुन्हा चौकशी )

दादरमधील भागोजी किर स्मशानभूमीमध्ये असलेल्या शौचालय आणि स्नानगृह यांना पाणी पुरवठा करण्यासाठी चार टाक्या बसवलेल्या आहेत. त्या सर्व टाक्यांचे पाणी एकमेकांना जोडण्यात आले आहे. आणि या एकाच लाईनमधून शौचालय व स्नानगृह यांना पाणी पुरवठा करणारी एक टाकी मे २०२२ रोजी फुटलेली आहे. याबाबत या स्मशानभूमीच्या नोंदणी अधिकाऱ्यांनी १८ जुलै २०२२ रेाजी जी उत्तर विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन पाठवून याची कल्पना दिली. ही टाकी फुटल्यानंतर महापालिकेच्या प्लंबरच्या मदतीने एम सील लावून तात्पुरती स्वरुपात डागडुजी केली आहे. परंतु त्यानंतर जुलैमध्ये ही टाकी अधिक फुटली गेली आणि त्यातील पाणी वाहून जात आहे. याबाबत महापालिका जी उत्तर विभागाला स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी तक्रार केल्यानंतरही आजपावेतो फुटलेली टाकी बदलण्यात आलेली नाही. परिणामी यासर्व टाक्या एकमेकांना जोडल्या गेलेल्या असल्याने या फुटक्या टाकीमुळे इतर तीन टाक्यांमधील पाणीही त्यामुळे वाहून जात आहे.

भागोजी किर स्मशानभूमीमध्ये मोठ्याप्रमाणात अंत्यविधीसाठी तसेच पुढील धार्मिक विधी करण्यासाठी येत असतात. त्यामुळे या स्मशानभूमीमध्ये पाण्याची सुविधा पुरवण्यासाठी या चार टाक्या बसवल्या असल्या तरी यातील एका फुटलेल्या टाकीमुळे यातील सर्व पाणी वाहून जात आहे. परिणामी याठिकाणी पाण्याची तीव्र समस्या निर्माण होत आहे. याबाबत माजी नगरसेवक मनिष चव्हाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी जुलै महिन्यांमध्ये तक्रार देऊनही येथील वैद्यकीय अधिकारी तसेच मेंटनन्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे फुटलेली गळकी पाण्याची टाकी त्वरीत बदलली जावी अशी मागणी त्यांनी केली आहे. एकाबाजुला पाणी वाचवा म्हणून महापालिका संदेश देते, परंतु दुसऱ्याबाजुला या गळक्या टाक्या बंद करून यातून वाहून जाणारे हजारो लिटर पाणी वाचवता येत नाही. त्यामुळे यातून वाया जाणारे हजारो लिटर वाचवले जावे अशी मागणीही करत त्यांनी जी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्तांनी विशेष लक्ष देण्याचीही सूचना केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here