रेल्वे अपघातात दररोज होतात इतके मृत्यू, लोहमार्ग पोलिसांनी दिली धक्कादायक आकडेवारी

128

लोकल ट्रेनने दररोज लाखो लोक प्रवास करत असतात. रेल्वे मार्गावर अपघात झाल्याच्या घटनाही अनेकदा समोर येत असतात. आता याचबाबत मुंबई लोहमार्ग पोलिसांनी एक धक्कादायक माहिती दिली आहे. मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर प्रवास करताना दररोज सुमारे 7 प्रवाशांना आपला प्राण गमवावा लागत असल्याचे लोहमार्ग पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे रेल्वे अपघातातील मृत्यूंबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

या कारणांमुळे अपघात

रेल्वे रूळ ओलांडणे, धावत्या लोकलमधून पडणे,रेल्वे रुळाजवळील खांबांना आपटून,प्लॅटफॉर्म आणि लोकलमधील गॅपमध्ये अडकणे,छतावरुन प्रवास करताना ओव्हरहेड वायरचा शॉक लागणे ही अपघातांची प्रमुख कारणे असल्याचे मुंबई लोहमार्ग पोलिसांनी म्हटले आहे. लोहमार्ग अपघातांमध्ये दररोज तब्बल 7 जणांचा मृत्यू होत आहे.

(हेही वाचाः सोने खरेदी करणा-यांसाठी धोक्याची घंटा, केंद्र सरकार लावू शकते ‘हा’ कर)

आवाहनाकडे दुर्लक्ष

कोरोनापूर्व काळात दररोज साधारणपणे 10 ते 11 लोकांना आपले प्राण गमवावे लागत होते. पण आता प्रवाशांच्या संख्येत घट झाल्यामुळे अपघाती मृत्यूंमध्ये देखील घट झाल्याचे लोहमार्ग पोलिसांनी म्हटले आहे. रेल्वे प्रशासनाकडून सुरक्षित प्रवासासाठी वारंवार आवाहन करण्यात येत असूनही त्याकडे दुर्लक्ष करुन रेल्वे रूळ ओलांडणे, धावत्या गाडीत चढणे किंवा उतरणे यामुळे प्रवासी आपला जीव धोक्यात घालत असतात.

अशी आहे आकडेवारी

2022 च्या नोव्हेंबरपर्यंत एकूण 579 प्रवाशांचा धावत्या लोकलमधून पडून मृत्यू झाला असल्याची माहिती सुद्धा लोहमार्ग पोलिसांनी दिली आहे. 2021 आणि 2022 मध्ये एकूण 130 आत्महत्या नोंदवण्यात आल्या असून 2022 मधील 10 महिन्यांत या आत्महत्यांमध्ये दुपटीने वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे.

(हेही वाचाः गॅस सिलेंडरच्या दरांबाबत सर्वसामान्यांना मोठा दिलासा, कसे आहेत दर?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.