माजी सैनिक, शहीद सैनिक पत्नी आणि कुटुंबियांना शिक्षक पात्रता परीक्षेत १५ टक्के गुणांची सवलत

राज्यातील माजी सैनिक, शहीद सैनिक पत्नी आणि कुटुंबियांना शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये १५ टक्के गुणांची सवलत देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. ही सवलत घेण्यासाठी पात्र उमेदवारांना माजी सैनिक आरक्षणांतर्गत नोंद करणे गरजेचे असून, त्यांनी १० ऑगस्ट २०२२ पर्यंत आवश्यक ते बदल करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

१५ टक्के गुणांची सवलत

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१’चे आयोजन २१ नोव्हेंबर २०२१ रोजी करण्यात आले होते. त्यानंतर ३० जून २०२२ च्या शासन निर्णयान्वये राज्यातील माजी सैनिक, शहीद सैनिक पत्नी व कुटुंबियांना शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये १५ टक्के गुणांची सवलत देण्यात आलेली आहे. परंतु, महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्ज भरताना माजी सैनिक आरक्षणांतर्गत नोंद घेण्यात आलेली नाही. त्यामुळे तशी नोंद करण्यासह अन्य दुरुस्ती करण्याकरिता उमेदवारांच्या लॉगिनमध्ये सुविधा देण्यात आलेली आहे.

( हेही वाचा : मुंबईच्या ४०० किलोमीटर रस्त्यांचे होणार सिमेंटीकरण; तब्बल ५८०० कोटी रुपये केले जाणार खर्च)

उमेदवारांनी आपले निवेदन १० ऑगस्ट २०२२ पर्यंत सादर करणे आवश्यक असून, नावातील अक्षरांत बदल करण्यासाठी एसएससी प्रमाणपत्र, जात संवर्ग बदल करण्यासाठी जात प्रमाणपत्र, तसेच माजी सैनिक आरक्षणाकरीता सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. यापूर्वी लेखी, ई-मेलद्वारे निवेदन दिले असले तरीही उमेदवारांनी पुन्हा: आपल्या लॉगिनमध्ये हे बदल समाविष्ट करणे गरजेचे आहे. मुदतीनंतर, तसेच अन्य प्रकारे (ई-मेल, फोन संदेश, लेखी पत्र इत्यादी) आलेल्या निवेदनाचा विचार केला जाणार नाही. प्राप्त सर्व दुरूस्त्यांचा विचार करून परीक्षा निकाल संकेतस्थळावर जाहीर केला जाईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here