निर्बंध डावलून शाळेने घेतली परीक्षा! मॉर्निंग स्टार इंग्लिश स्कूलचा मनमानी कारभार! 

शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी तात्काळ याची दखल घेतली. संबंधित शाळेला परीक्षा सुरु असतानाच भेट देऊन परीक्षा बंद करायला लावली. 

85

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे राज्य सरकारने राज्यात कडक निर्बंध लागू केले. त्याआधी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी इयत्ता १ ली ते ८ वीपर्यंतच्या सरसकट सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात येत आहे, त्यांच्या परीक्षा घेण्यात येणार नाही, अशी घोषणा शनिवार, ३ मार्च रोजी केली. असे असूनही धारावी येथील मार्निंग स्टार इंग्लिश स्कूलच्या प्रशासनाने सरकारच्या निर्णयाला पायदळी तुडवत चक्क ५ मार्चपासून वेळापत्रकाप्रमाणे इयत्ता ३रीच्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून त्यांची परीक्षा घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

काय आहे प्रकरण? 

  • कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे राज्य सरकारने राज्यभर कडक निर्बंध लागू केले. त्यामध्ये शाळा-महाविद्यालये बंद केली.
  • इयत्ता १ ली ते ८ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता त्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला.
  • तरीही धारावी येथील मार्निंग स्टार इंग्लिश स्कूलने प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली.
  • इयत्ता ३ रीच्या विद्यार्थ्यांची ५ मार्च ते १२ मार्चपर्यंत लेखी परीक्षेचे नियोजन केले.
  • शाळा बंद ठेवण्याचा आदेश असूनही ५ मार्च रोजी इंग्रजी विषयाची लेखी परीक्षा घेतली
  • पालकांचा विरोध असूनही ६ मार्च रोजीही गणिताची परीक्षा घेतली.

मार्निंग स्टार इंग्लिश स्कूल इयत्ता ३ रीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेत असल्याची माहिती मिळताच आम्ही त्या शाळेत ताबडतोब भेट देऊन परीक्षा बंद केली. शाळेच्या प्रशासनाला पुन्हा परीक्षा घेतल्यास साथरोग प्रतिबंध कायद्यांतर्गत कारवाई करू, असा इशारा दिला आहे. शाळेने ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. खरे तर कोणत्याही प्रकारची परीक्षा घेण्याची परवानगी नाही. ही परीक्षा सक्तीची नाही.
– महेश पालकर, शिक्षणाधिकारी, महापालिका

हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून पालकांचा विरोध! 

  • हा प्रकार काही पालकांनी हिंदू जनजागृती समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून दिला.
  • समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ताबडतोब घडल्याप्रकरणी शालेय शिक्षण मंत्री, अप्पर सचिव, शालेय शिक्षण विभाग, शिक्षण उपसंचालक कार्यालय आणि शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई या सर्वांकडे तक्रार केली.
  • त्यानंतर शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी तात्काळ याची दखल घेतली.
  • संबंधित शाळेला परीक्षा सुरु असतानाच भेट देऊन परीक्षा बंद करायला लावली.
  • तसेच पुन्हा परीक्षा घेतल्यात आपत्कालीन कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा इशारा दिला.
tt
इयत्ता ३रीच्या लेखी परीक्षेचे हे होते वेळापत्रक

(हेही वाचा : लॉकडाऊनमध्ये व्यापारी ‘रस्त्यावर’!)

तरीही ऑनलाईन परीक्षा होणार! 

दरम्यान शिक्षणाधिकारी पालकर यांनी शाळेला परीक्षा न घेण्याचा आदेश दिला, तरीही शाळेच्या प्रशासनाने पालकांना आम्ही ७ मार्च रोजी ऑनलाईन परीक्षा घेणार आहोत, असे सांगितले आहे. त्यामुळे पालकवर्गात अजूनही नाराजी आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.