महापालिकेच्या लिपिकांच्या परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच!

लॉकडाऊनमुळे या परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नसल्याने, ही परीक्षा पार पाडण्याबाबत प्रशासनाचा निर्णय पक्का असल्याचे सामान्य प्रशासनाने स्पष्ट म्हटले आहे.

मुख्य लिपिक, वरिष्ठ लेखा परीक्षा व लेखा सहाय्यक(प्रमुख लेखापाल खाते) या पदांसाठी घेण्यात येणारी खात्यांतर्गत लेखी परीक्षा ही नियोजित तारखेलाच घेतली जाणार आहे. आज तारखेपर्यंत तरी नियोजित वेळेतच ही परीक्षा घेण्यावर प्रशासन ठाम आहे, असे सामान्य प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शनिवार व रविवारच्या दिवशी कडक लॉकडाऊन असला तरी या परीक्षेसाठी सवलत दिली आहे. त्यामुळे लॉकडाऊनमुळे या परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नसल्याने, ही परीक्षा पार पाडण्याबाबत प्रशासनाचा निर्णय पक्का असल्याचे सामान्य प्रशासनाने स्पष्ट म्हटले आहे.

परीक्षा पुढे ढकलण्याची परीक्षार्थींची मागणी

मुंबई महापालिकेच्या विविध खात्यांतील लिपिक तसेच त्या संवर्गातील मुख्य लिपिक पदाच्या परीक्षेसाठी २ हजार १४० आणि वरिष्ठ लेखा परीखा व लेखा सहाय्यक पदांच्या परीक्षेसाठी ३९३ अशी एकूण २ हजार ५३३ इच्छुक व पात्र उमेदवारांची परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी शुक्रवारी १६ ते रविवार १८ एप्रिल २०२१ या कालावधीत ही परीक्षा होणार आहे. मात्र, कोविडच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली जात आहे. ही परीक्षा शनिवारी व रविवारी होणार असल्याने, या दिवशी कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे या कालावधीत परीक्षेला बाहेर पडायचे कसे, असा सवाल उपस्थित करत परीक्षार्थी ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी करत आहेत. तसेच अनेक कर्मचारी हे कोविडबाधित असून काही जण बाधित रुग्णांच्या संपर्कातील असल्याने, अनेक जण क्वारंटाईन आहेत. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत आहे.

(हेही वाचाः कडक निर्बंधांच्या नावाखाली मुंबईत अघोषित लॉकडाऊन! भाजप गटनेते प्रभाकर शिंदेंची टीका)

सामान्य प्रशासन निर्णयावर ठाम

यापूर्वी २०१७मध्ये ही परीक्षा झाली आहे. यापूर्वी दोनदा ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा ही परीक्षा पुढे ढकलल्यास त्याचे नियोजन ठरवण्यास अजून सहा महिन्यांचा कालावधी लागेल, असे स्पष्ट करत सामान्य विभागाचे सहआयुक्त मिलिन सावंत यांनी सांगितले. त्यामुळे ही परीक्षा आजच्या तारखेपर्यंत तरी निश्चित केलेल्या तारखेलाच करण्याच्या निर्णयावर प्रशासन ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. जे कर्मचारी परीक्षेला बसणार आहेत, ते सर्व सध्या कामाला येत आहेत. तसेच शनिवारी व रविवारी कडक लॉकडाऊन असला तरी, आयुक्तांनी यादिवशी परीक्षार्थींना परवानगी दिली आहे. त्यामुळे कोविडसंदर्भातील सर्व नियमांचे पालन करुन सुरक्षित अंतर राखत ही परीक्षा पार पाडली जाईल, असे सावंत यांनी स्पष्ट केले.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here