Rice : आता बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी; केंद्राचा मोठा निर्णय

160
केंद्र सरकार साखरेच्या निर्यातीवर बंदी आणण्याच्या विचारात असताना आता बासमती तांदळाच्या निर्यातीवर सशर्त बंदी घातली आहे. यासंदर्भात अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यापूर्वी २० जुलै रोजी केंद्र सरकारने बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. आगामी सणासुदीचा हंगाम लक्षात घेऊन, देशांतर्गत पुरवठा वाढवून त्यांच्या किरकोळ बाजारातील किमती नियंत्रणात ठेवण्याच्या उद्देशाने सरकारने हे पाऊल उचलले होते. यापूर्वी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये तुकडा तांदळाची निर्यातही बंद करण्यात आली होती.
या नवीन निर्णयामुळे १२०० डॉलर्स प्रति टन पेक्षा कमी किंमतीवर सर्व बासमती तांदळाची निर्यात तात्पुरती थांबवली जाईल. दरम्यान, याचा फायदा पाकिस्तानला मिळू शकेल असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २०२२-२३ या आर्थिक वर्षात भारताने ४.८ अब्ज डॉलर्स किमतीचा बासमती तांदूळ निर्यात केला. प्रमाणानुसार ही निर्यात ४.५६ दशलक्ष टन होती.

बिगर बासमती तांदळाचा हिस्सा किती

अन्न मंत्रालयाने गेल्या महिन्यात सांगितले होते की, देशाच्या एकूण तांदूळ निर्यातीमध्ये बिगर बासमती पांढऱ्या तांदळाचा वाटा सुमारे २५ टक्के आहे. त्याच्या निर्यातीवर बंदी घातल्याने देशातील ग्राहकांसाठी किंमती कमी होण्यास मदत होईल. धान्याचे भाव वाढल्यानंतर बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. एप्रिल-जून तिमाहीत बिगर बासमती पांढऱ्या तांदळाची निर्यात वाढून १५.५४ लाख टन झाली. जी मागील वर्षीच्या तिमाहीत ११.५५ लाख टन होती. खरीप पीक वर्ष २०२२-२३ मध्ये देशातील तांदळाचे एकूण उत्पादन १३५.५ दशलक्ष टनांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे, जे एका वर्षापूर्वी १२९.४ दशलक्ष टन होते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.