पुण्यात रेमडेसिवीरचा काळाबाजार करणारी टोळी गजाआड! २१ इंजेक्शन जप्त! 

आरोपी हे रेमडेसिवीर गरजू रुग्णांच्या नातेवाईकांना एक इंजेक्शन ३०-४० हजार रुपयांमध्ये विकत होते. या आरोपींकडे रेमडेसिवीर विकण्याचा परवाना नाही.

120

राज्यात रेमडेसिवीर या कोरोनावरील महत्वाच्या इंजेक्शनचा काळाबाजार होत आहे. हा काळाबाजार होऊ नये म्हणून केंद्र सरकारने या इंजेक्शनच्या वितरणाचे नियंत्रण स्वतःकडे ठेवले. तसेच मेडिकलच्या ऐवजी जिल्ह्याधिकाऱ्यांचा माध्यमातून या इंजेक्शनचे वितरण सुरु केले. मात्र तरीही या इंजेक्शनचा काळाबाजार थांबलेला नाही. याचा प्रत्यय राज्यातील विविध राज्यात दररोज येत आहे. सोमवारी, १० मे रोजी तर पुण्यातील २१ रेमडेसिवीर इंजेक्शन काळ्या बाजारात  विकण्याचा प्रयत्न करणारी टोळी गजाआड केली. वाकड पोलिसांनी ही कारवाई केली. यात मेडिकल चालकासह ३ जणांना बेड्या ठोकण्यात आल्या. यातील ३ आरोपींना पोलिस कोठडी सुनावण्यात आली. या कारवाईची माहिती पुण्याचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली.

वाकड पोलिसांनी केली कारवाई!

पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २१ रेमडेसिवीर इंजेक्शनसह १० लाख ३६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. कृष्णा रामराव पाटील (वय २२, रा. थेरगाव), निखिल केशव नेहरकर (वय १९, रा. बिजलीनगर, चिंचवड), शशिकांत रघुनाथ पांचाळ (वय ३४, रा. जयमल्हार नगर, दत्त कॉलनी, थेरगाव), अशी आरोपींची नावे आहेत. पुण्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या औषध निरीक्षक भाग्यश्री यादव यांनी याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.

(हेही वाचा : म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर होणार आता मोफत उपचार! काय म्हणाले टोपे?)

एक इंजेक्शन ३०-४० हजार रुपयांमध्ये विकायचे!   

पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेवाडी फाटा येथे सरप्राइज नाकाबंदी सुरू असताना रविवारी, ९ मे रोजी पहाटे पावणेतीनच्या सुमारास आरोपी पाटील व नेहरकर यांची दुचाकी थांबवून तपासणी केली. त्यावेळी आरोपींकडे दोन रेमडेसिवीर मिळाले. आरोपी पांचाळ याच्याकडून इंजेक्शन घेतल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार पोलिसांनी आरोपी पांचाळ याला ताब्यात घेऊन त्याच्या चारचाकी वाहनातून १९ रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त केले. जप्त रेमडेसिवीर गोदावरी मेडिकल स्टोअर्स (इन हाऊस क्रिस्टल हॉस्पिटल) व आयुश्री मेडिकल स्टोअर्स (संलग्न ओनेक्स हॉस्पिटल) यांच्या नावे अलॉट करण्यात झाले होते. आरोपी हे रेमडेसिवीर गरजू रुग्णांच्या नातेवाईकांना एक इंजेक्शन ३०-४० हजार रुपयांमध्ये विकत होते. या आरोपींकडे रेमडेसिवीर  विकण्याचा परवाना नाही. हे आरोपी इंजेक्शन विकून ते पैसे आरोपी शशिकांत पांचाळ याला देत होते, असे पोलिसांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.