राज्यातील १३ कोटी जनतेच्या सुरक्षेसाठी २४ तास कार्यरत असणाऱ्या पोलिसांना (Mumbai Police) मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः मुंबई पोलिसांमध्ये हजारो पदे रिक्त असून, कायमस्वरूपी भरती प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयात सध्या कार्यरत असलेल्या ३ हजार हंगामी पोलिसांना मुदतवाढ देण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन आदेश गृहविभागाने जारी केला आहे.
मुंबई पोलिसांमधील मनुष्यबळाची कमतरता
बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षक या संवर्गातील एकूण ४०,६२३ पदे मंजूर आहेत. मात्र, यापैकी पोलीस शिपाई संवर्गातील सुमारे १० हजार पदे रिक्त आहेत. उपलब्ध मनुष्यबळ दैनंदिन कर्तव्ये पार पाडण्यासाठी अपुरे पडत असल्याने पोलिसांवर प्रचंड ताण येत आहे. शासनाने २१ जानेवारी २०२१ रोजी जारी केलेल्या निर्णयानुसार, बृहन्मुंबई पोलीस (Mumbai Police) आयुक्तालयासाठी ७,०७६ पोलीस शिपाई आणि ९९४ पोलीस चालक संवर्गातील पदे भरण्यास मंजुरी दिली होती. तरीही, ही भरती प्रक्रिया सुरू असताना उर्वरित सुमारे ३ हजार पदे रिक्त राहिली आहेत.
हंगामी पदांना ११ महिन्यांची मुदतवाढ
या रिक्त पदांमुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत ३ हजार हंगामी पोलिसांची नियुक्ती करण्यात आली होती. आता या मनुष्यबळाला ११ महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे मुंबई पोलिसांना (Mumbai Police) तात्पुरता दिलासा मिळणार असून, दैनंदिन कामकाज आणि सुरक्षेची जबाबदारी पार पाडण्यात मदत होईल. गृहविभागाच्या या निर्णयाचे पोलिस अधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे.
राज्यभरात २१ हजार पदे रिक्त
राज्याची लोकसंख्या १२ कोटींहून अधिक असताना पोलिसांची मंजूर पदे २ लाख १९ हजार ८२२ इतकी आहेत. यापैकी १ लाख ९८ हजार ८०७ पदे भरलेली असून, तब्बल २१ हजार १०८ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे पोलिसांवर कामाचा प्रचंड ताण येत असल्याचे चित्र आहे. विशेषतः मुंबईसारख्या महानगरात वाहतूक व्यवस्था, गुन्हेगारी नियंत्रण आणि सार्वजनिक सुरक्षेसारख्या जबाबदाऱ्या पार पाडताना मनुष्यबळाची कमतरता प्रकर्षाने जाणवते. “राज्य सरकारने याबाबत तातडीने ठोस पावले उचलून रिक्त पदे भरण्यावर भर द्यावा,” अशी मागणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केली आहे.
पोलिसांवरील ताण आणि उपाययोजना
मुंबईसारख्या घडामोडींनी भरलेल्या शहरात पोलिसांना (Mumbai Police) सतत तैनात राहावे लागते. मात्र, अपुऱ्या मनुष्यबळामुळे त्यांच्या कामाच्या तासांमध्ये वाढ होत आहे. हंगामी पदांना मुदतवाढ देणे हा तात्पुरता उपाय असला तरी कायमस्वरूपी भरती प्रक्रिया गतिमान करणे ही काळाची गरज आहे. गृहविभागाने याबाबत पुढील रणनीती आखण्याचे संकेत दिले असून, लवकरच रिक्त पदे भरण्यासाठी पावले उचलली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
मुंबई पोलिसांतील ३ हजार हंगामी पदांना मुदतवाढ देण्याचा निर्णय म्हणजे तात्कालिक दिलासा देणारा उपाय आहे. मात्र, राज्यभरातील २१ हजार रिक्त पदे आणि मुंबईतील १० हजार रिक्त पदांचा प्रश्न कायम आहे. सरकारने भरती प्रक्रियेला गती देऊन पोलिसांना बळकटी देण्याची गरज असून, त्यादृष्टीने ठोस पावले उचलली जाणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या तरी या मुदतवाढीमुळे मुंबई पोलिसांना (Mumbai Police) आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी काही प्रमाणात आधार मिळाला आहे.