आमदार प्रणिती शिंदे यांनी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप फॉर्म भरत असताना अनेक अडचणी येत असल्याने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती. त्यानुसार विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप फॉर्म भरण्याकरीता 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ मिळालेली आहे.
१५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्कॉलरशिपचा फॉर्म भरण्यास 31 जानेवारी 2022 ही शेवटची तारीख देण्यात आलेली आहे. अनेक विद्यार्थ्यांना कोव्हिड-19 च्या महामारीमुळे उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला व इतर कागदपत्रे मिळण्याकरीता अडचणी येत आहेत. तसेच शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेले पोर्टल स्लो आहे. यामुळे अनेक विद्यार्थी फॉर्म भरण्यापासून वंचित राहत आहेत. सदर फॉर्म भरत असताना उमेदवारांना येत असलेल्या अडचणी दूर व्हाव्यात याकरीता आमदार शिंदे यांना विद्यार्थी व प्रा. डॉ. डी. आर. गायकवाड यांनी निवेदनाद्वारे विनंती केली होती. याबाबत आमदार शिंदे यांनी सोमवार 30 जानेवारी 2022 रोजी सकाळी धनंजय मुंडे यांच्याशी भ्रमणध्वनीव्दारे बोलणे करून या अडचणी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या तसेच सदरच्या अडचणी दूर करून त्यांना फॉर्म भरण्यासाठी मुदत वाढवून मिळावी अशी मागणी केली होती.
( हेही वाचा : महिलांसाठी खुशखबर! ‘या’ रेल्वे स्थानकात पहिलं ‘पावडर रूम लाउंज’ )
या संदर्भात मुंडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून महाराष्ट्र शासनाच्या वतीने स्कॉलरशिपचा फॉर्म भरण्याची मुदत तात्काळ वाढवून देण्यास्तव संबंधितांना सूचना दिल्या. त्यानुसार विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचा फॉर्म भरण्याची 15 फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढवून दिल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांनी आमदार शिंदे यांचे आभार मानले आहे.
Join Our WhatsApp Community