आरटीईअंतर्गत पात्र पाल्यांच्या शाळा प्रवेशासाठी ९ जुलैपर्यंत मुदतवाढ!

आरटीईअंतर्गत बालकांना ३० जून २०२१ पर्यंत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावयाचा होता. मात्र, आता या प्रवेशासाठी ९ जुलै २०२१ पर्यत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

83

सन २०२१-२२ करीताच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेनुसार आरटीईअंतर्गत निवड झालेल्या बालकांच्या प्रवेशासाठी ३० जूनपर्यंतची मुदत संपुष्टात आली. आता या पाल्यांना प्रवेश घेण्‍यासाठी ९ जुलै, २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे बालकांच्या प्रवेशासाठी ९ जून ही अंतिम तारीख असेल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

७ एप्रिल २०२१ रोजी लॉटरी काढली होती!

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९” अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करीता पात्र खासगी विना-अनुदानित शाळांतील (अल्पसंख्याक शाळा वगळून) प्रवेशाच्या सुरुवातीच्या वर्गात वंचित व दुर्बल घटकातील बालकांच्या प्रवेशासाठी २५ टक्के जागा राखीव असतात. या राखीव जागांवर ऑनलाईन पद्धतीने लॉटरी काढण्यात येऊन प्रवेश दिले जातात. यानुसार यंदाच्या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी ७ एप्रिल २०२१ रोजी राज्य स्तरावर लॉटरी काढण्यात आली होती. त्यानुसार आरटीई २५ टक्के अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करीता प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांना ३० जून २०२१ पर्यंत शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावयाचा होता. मात्र, आता या प्रवेशासाठी ९ जुलै २०२१ पर्यत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

(हेही वाचा : मूर्तिकारांना बाप्पा पावला! तयार मूर्ती विकणाऱ्यांना व्यावसायिकांना मंडप परवानगी नाही!)

निवड यादीतील पालकांनी पाल्याचे प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन!

या निवड यादीतील पात्र विद्यार्थ्यांसाठी पालकांना प्रवेशाबाबत एस.एम.एस. पाठविण्यात आलेले आहेत. पाल्याच्या शिक्षणाची संधी वाया जावू नये, यासाठी निवड यादीतील सर्व पालकांनी शाळेत जाऊन आपल्या पाल्याचे ९ जुलै २०२१ पूर्वी प्रवेश निश्चित करावेत. निवड यादीतील बालकांच्या पालकांना लॉकडाऊनमुळे अथवा बाहेरगावी असल्याने किंवा अन्य कारणांमुळे शाळेत प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घेणे शक्य नसेल त्यांनी शाळेशी संपर्क करावा आणि व्हॉट्सअप / ई-मेलद्वारे किंवा अन्य माध्यमांद्वारे बालकांच्या प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे सादर करावीत आणि आपल्या पाल्याचा तात्पुरता प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

यादी आरटीई पोर्टलवर उपलब्ध!

तसेच शाळांनीही प्राथमिक स्तरावर प्राप्त झालेली प्रवेशाची कागदपत्रे पडताळणी समितीला दाखवून पडताळणी करुन प्रवेश निश्चित करावेत. प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांची यादी आरटीई पोर्टलवर उपलब्ध आहे. त्या यादीतील शाळेत प्रवेशासाठी अद्याप न आलेल्या बालकांच्या पालकांना दूरध्वनीद्वारे, ई-मेलद्वारे संपर्क करून त्यांच्या प्रवेशाची कार्यवाही दिनांक ९ जुलै २०२१ पूर्वी पूर्ण करण्यात यावी, असेही महानगरपालिकेच्या शिक्षण खात्याद्वारे कळविण्यात आले आहे

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.