गॅंग ऑफ ‘वाझे’पूर पार्ट – २ : पोलिसांविरुद्ध खंडणीसह २९ गंभीर गुन्हे नोंद!

मोक्का कायदा न लावण्यासाठी २० कोटी रुपयाची मागणी करण्यात आली होती.

107

मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलिसांनी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंगसह मुंबई गुन्हे शाखेच्या ६ पोलिस अधिकारी आणि दोन बांधकाम व्यवसायिक असे एकूण ८ जणांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात मरिन ड्राईव्ह पोलिसांकडून दोन बांधकाम व्यावसायिकांना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपी आणि इतर पोलिस अधिकारी यांच्यावर खंडणी उकळणे, फसवणूक, बोगस दस्तऐवजसह सुमारे २९ गंभीर स्वरूपाची कलमे लावण्यात आलेले आहे. गुन्हा दाखल होताच ‘गॅंग ऑफ ‘वाझे’पूरचा पार्ट’- २ अशी चर्चा मुंबई पोलिस दलात सुरु झाली आहे.

पोलिस ‘अशी’ मागायचे खंडणी!

ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाने मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक संजय पुनामिया आणि सुनील जैन या दोघांना बुधवारी रात्रीच दक्षिण मुंबईतून अटक केली आहे. या बांधकाम व्यावसायिकाच्या तक्रारीत संजय पुनामिया आणि सुनील जैन या दोघांनी मिळून आपल्याला ठाणे येथे एका गुन्ह्यात अडकवले होते, त्यात तक्रारदाराला अटक झाली होती. त्यावेळी ठाणे पोलिस आयुक्त म्हणून परमबीर सिंग हे होते, आपल्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करून तुरुंगातून बाहेर पडू देणार नसल्याची धमकी माझ्या पुतण्याला दिली व मोक्का कायदा न लावण्यासाठी २० कोटी रुपयाची मागणी करण्यात आली होती. त्या दरम्यान माझ्या पुतण्याने ९ कोटी परमबीर सिंग यांना दिले होते.

(हेही वाचा : राज कुंद्राची अटक वाझेमुळे टळलेली का?)

अटक न होण्यासाठी पैसे मागितले!

संजय पुनामियाने माझ्या जमिनीचे खोटे दस्तवेज तयार करून ती स्वतःच्या नावावर केली होती. हा सर्व प्रकार २०१६ ते २०१८ च्या दरम्यान झाला त्यानंतर परम बीर सिंग हे मुंबईचे पोलिस आयुक्त बनून मुंबईत आल्यानंतर २०२१ मध्ये माझ्यावर जुहू पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या कक्ष ९ च्या अधिकाऱ्यांनी हा गुन्हा दाखल करून मला या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्त यांच्या संगनमताने ५० लाख रुपयांची मागणी केली होती. हि रक्कम कक्ष ९ च्या एका महिला अधिकारी यांना सोपवण्यात आली होती. त्यानंतर एसीपी यांनी देखील २५ लाख रुपयाची रक्कम मागितली. अन्यथा मला गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली, असे त्या बांधकाम व्यावसायिकाने तक्रारीत म्हटले.

‘या’ पोलिसांवर गुन्हे दाखल!

तक्रारदार याने मरीन ड्राईव्ह पोलिसांना दिलेल्या जबाबात हे सर्व आरोप करण्यात आल्यानंतर मरीन ड्राईव्ह पोलिसांनी संजय पुनामिया, सुनील जैन, माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग, पोलिस उपायुक्त अकबर पठाण, एसीपी श्रीकांत शिंदे कक्ष ९ तत्कालीन प्रभारी पोलिस निरीक्षक नंदकुमार गोपाळे, पोलिस निरीक्षक आशा कोरके, संजय पाटील आणि इतर यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 387,388,389,403,409,420,423,464,465,467,468,471,120 (b),166,167,177,181,182,193,195,203,211,209,210,347,109,110,111,113 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हयात तब्बल २९ कलमे लावण्यात आली आहे. प्रत्येक कलम हे गंभीर स्वरूपाचे आहे, यातील महत्वाचे कलमी खंडणी उकळणे, फसवणूक, बोगस दस्तवेज हे असून इतर कलम देखील गंभीर स्वरूपाचे आहे. प्रथमच एखाद्या गुन्ह्यात एवढे कलम लावण्यात आल्याची चर्चा पोलिस दलात सुरु असून आता ‘गॅंग ऑफ ‘वाझे’पूर’चा हा भाग दुसरा सुरु झाल्याची चर्चा मुंबई पोलिस दलात रंगत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.