मुंबईतील प्राथमिक आरोग्य सेवेला बळकट करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही मोहीम राबवून आतापर्यंत १०६ ठिकाणी दवाखाने सुरु केले. त्यातील ५० दवाखान्यांमध्ये नेत्र चिकित्सा बाह्य रुग्ण कक्ष अर्थात ओपीडी सुरु करण्यात येणार आहे. येत्या दोन महिन्यांमध्ये दवाखान्यांमध्ये ही डोळ्याच्या आजारांवरील ओपीडी सेवा दिली जाणार असल्याने नागरिकांना आता खासगी डॉक्टरांच्या दवाखाने व रुग्णालयात जावून अति खर्चिक उपचार घेण्याऐवजी कमी दरात डोळ्यावरील उपचार करून आपली दृष्टी वाढवता येईल.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते १७ नोव्हेंबर २०२२ बाळासाहेबांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचे लोकार्पण करण्यात आले. तेव्हापासून हाती घेतलेल्या योजनेपैकी सध्या १०६ ठिकाणी आपला दवाखाने सुरु झाले आहेत. तर ४ फेब्रुवारी २०२३ पर्यंत आपला दवाखान्यांमधून आतापर्यंत ३ लाख ०१ हजार ०७५ नागरिकांनी विविध सुविधांचा लाभ घेतला आहे. यापैकी दवाखान्यांमधून २ लाख ८८ हजार ०२० रुग्णांनी मोफत वैद्यकीय तपासणी व मोफत औषधोपचार यांचा लाभ घेतला आहे. तर, पॉलिक्लिनिक व डायग्नोस्टिक केंद्र येथे १३ हजार ०५५ रुग्णांनी दंतचिकित्सा, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, जनरल फिजिशियन, त्वचारोग तज्ज्ञ अशा उपचार सुविधांचा लाभ घेतला आहे.
(हेही वाचा ‘आरे’ तील वृक्षतोडीला राज्य सरकारने याचिकाकर्त्यालाच ठरवले जबाबदार)
आपला दवाखान्यांमधून आता नेत्र चिकित्साची सुविधा दिली जाणार असून मुंबईतील ५० दवाखान्यांमध्ये डोळ्याच्या उपचार आता ओपीडीमध्ये केला जाणार आहे. या ऑप्थॉल्मिक ओपीडीसाठ आवश्यक त्या उपकरणांची खरेदी करण्यात येत आहे. यासाठी ऑप्थाल्मिक रिफ्रॅक्शन युनिट अर्थात चेअर, स्लिट लैम्प बायोमायक्रोस्कोप अपलानेशन टोनोमीटर व ऑटो केराटो-रिफ्रॅक्टोमीटर आदींसह शिआटझ टोनोमीटर, डायरेक्ट ऑप्थाल्मोस्कोप, ट्रायल लेन्स सेट विथ प्लास्टिक रिमट्रायल फ्रेम व आय चार्ट आदींची खरेदी करण्यात येत आहे. यासर्व खरेदीसाठी सुमारे चार कोटी रुपये खर्च केले जाणार असून यासाठी मोबॅलिटी ग्लोबल आयएनसी या कंपनीची निवड करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community