फेसबुक ग्रुपमुळे मिळाले दहा गावच्या ग्रामस्थांना पाणी!

143

संगमेश्वर तालुक्यातील अंत्रवली शेरेवाडी आणि परिसरातील दहा गावांमध्ये सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. यावर मात करण्यासाठी निसर्गरम्य चिपळूण आणि निसर्गरम्य संगमेश्वर या फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून तरुणाईने एकत्र येऊन मदतीचा हात पुढे केला आहे. या उपक्रमासाठी मुंबई, ठाणे येथून मदत घेऊन समस्याग्रस्त ग्रामस्थांना सहकार्य केले जात आहे.

( हेही वाचा : मुंबईप्रमाणे अन्य कोणत्या भागात आहे सहप्रवाशांना हेल्मेटसक्ती? )

फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून पाणी समस्याग्रस्त ग्रामस्थांना सहकार्य 

संगमेश्वर तालुक्यातील उमरे धरणातील पाणी नदी पात्रात सोडण्यात आले. त्यामुळे परिसरातील दहा गावांमध्ये पाणीटंचाई भेडसावू लागली. या गावांमध्ये आता टँकरने पाणी पुरवण्यात येत आहे. परंतु शासकीय पातळीवरील पाणी पुरवठ्यासाठी येणाऱ्या टँकरची वाट बघत बसणे हेच या दहा गावांतील ग्रामस्थांच्या नशिबी आले आहे. टँकर येण्याच्या वेळा अनियमित असून, कधीकधी टँकर गावात येतही नाहीत. त्यामुळे पाण्यावाचून गावकऱ्यांचे अतिशय हाल होत आहेत. या समस्येवर तोडगा म्हणून केवळ शासकीय पातळीवर पाठपुरावा न करता, प्रत्यक्षात लोकसहभाग मोलाचा आहे, हे लक्षात घेऊन संदेश जिमन (फेसबुक ग्रुपचे प्रमुख) आणि त्यांच्या सहकार्यांनी ज्या गावांमध्ये अजिबात पाणीपुरवठा होत नाही, तेथे खासगी पातळीवर टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे ठरवले. या कार्यात या फेसबुक ग्रुपच्या तरुणाईला मुंबईतील चाकरमान्यांकडून उत्तम प्रकारे प्रतिसाद मिळाला असून अनेकांनी टँकरच्या भाड्याचे, पाण्याच्या मूल्यासाठी आर्थिक सहकार्य केले आहे.

या देणगीतून टंचाईग्रस्त गावांना नियमित पाणीपुरवठा केला जात आहे. निसर्गरम्य चिपळूण आणि निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून दीपक पवार, गणपत दाभोळकर, उदय मालप, नरेंद्र खानविलकर, मुकुंद सनगरे योगेश मालप, नितेश मालप, अरुण मालप तसेच अंत्रवली शेरेवाडीतील ग्रामस्थांनी विशेष सहकार्य केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.