मुंबई महापालिकेत Facial Biometric Attendance ची सक्ती, पण मुख्यालयातच मशिन्सअभावी बोंबाबोंब

3524
मुंबई महापालिकेत Facial Biometric Attendance ची सक्ती, पण मुख्यालयातच मशिन्सअभावी बोंबाबोंब
  • सचिन धानजी, मुंबई

मुंबई महापालिकेच्या सर्व विभागांची कार्यालयीन उपस्थिती लिनक्स आधारित फेशियल बायोमेट्रिक हजेरी (Facial Biometric Attendance) प्रणालीचा अवलंब केला असून एक जानेवारी २०२५ पासून जुनी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली बंद करण्यात आली आहे. मात्र, पहिल्या दोन दिवसांमध्ये महापालिका मुख्यालयात या हजेरी नोंदवण्यावरून गोंधळ झाल्याचे पहायला मिळत आहे. महापालिका मुख्यालयात हजारो कर्मचारी असून त्यांच्यासाठी केवळ तीनच मशीन असल्याने हजेरीसाठी कर्मचाऱ्यांनी शंभर ते दीडशे मीटर लांब रांगेत उभे राहावे लागते.

मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी विद्यमान बायोमेट्रिक हजेरी प्रणाली बंद करून फेशियल बायोमेट्रिक हजेरी (Facial Biometric Attendance) प्रणालीचा अवलंब केल्यानंतर प्रत्यक्षात जानेवारीपासून ही हजेरी सक्तीची करण्यात आली आहे. ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत ७९ हजार ८१५ कामगार, कर्मचाऱ्यांची नोंदणी पूर्ण झालेली आहे. त्यामुळे सुमारे १० हजार ७७३ कर्मचाऱ्यांची नोंदणी शिल्लक असली तरी महापालिकेने पूर्व सूचना दिल्याप्रमाणे १ जानेवारी २०२५ पासून याची सुरुवात केल्याने पगार कापला जाऊ नये या भीतीने कर्मचाऱ्यांनी थंब बायोमेट्रिक सह फेशियल बायोमेट्रिक हजेरी (Facial Biometric Attendance) अशाप्रकारे दोन्ही प्रणालीचा अवलंब सुरु ठेवला आहे. तर काहींनी फेशियलचा वापर करण्यास सुरुवात केली आहे.

(हेही वाचा – Biometric Attendance : मुंबई महापालिकेत बायोमेट्रिक हजेरी बंद, नवीन फेशियल बायोमेट्रिक हजेरी सुरु)

सुमारे १०० कर्मचाऱ्यांकरता एक याप्रमाणे फेशियल बायोमेट्रिक मशिन खरेदी करण्यात येत असल्याचे प्रशासनाने जाहिर केले असले तरी प्रत्यक्षात महापालिका मुख्यालयातच पुरेशा मशिन्स नसल्याने कर्मचाऱ्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. आतापर्यंत विविध कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार १८०० मशिन्स बसवण्यात आल्याची माहिती सामान्य प्रशासन विभाग आणि यांत्रिक व विद्युत विभागाच्या माध्यमातून दिली जात असली तर महापालिका मुख्यालयातील प्रवेशद्वार क्रमांक २, प्रवेशद्वार क्रमांक ६ आणि प्रवेशद्वार क्रमांक ७ वरच फेशियल बायोमेट्रिक मशिन्स (Facial Biometric Attendance) बसवण्यात आले आहे. त्यामुळे केवळ तीन मशिन्सवर हजारो कर्मचारी कशाप्रकारे हजेरी नोंदवणार असा प्रश्न कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. मुख्यालयातील कर्मचारी हे बहुतांशी सहा वाजता सुटतात. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या नियोजित लोकल असल्याने त्यांना ते वेळेत जाऊन पकडणे आवश्यक असते. परंतु केवळ तीनच मशिन्स असल्याने शंभर ते दीडशी मीटर लांबीपर्यंत जाणाऱ्या रांगामुळे कर्मचाऱ्यांचे मागील दोन दिवसांमध्ये नेहमीच्या गाड्या सुटण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मुख्यालयात जर प्रत्येक प्रवेशद्वाराजवळ प्रत्येकी दोन किंवा प्रत्येक मजल्यावर प्रत्येकी दोन मशिन्स लावल्या गेल्यास सकाळी सेवेत रुजू होताना आणि संध्याकाळी सुटल्यानंतर वेळेत घरी जाता येईल तसेच कार्यालयात वेळेत रुजू होता येईल.

सध्या लेखापाल वित्त विभागात दोन फेशियल बायोमेट्रिक मशिन्स असून या दोन्ही मशिन्स कार्यालयातून बाहेर आणल्यास त्याचा फायदा अन्य कर्मचाऱ्यांनाही होईल. महापालिकेच्या यांत्रिक व विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही अद्यापही या मशिन्स बसवण्यास जाणीवपूर्वक विलंब केला असल्याचे दिसून येत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.