Fall of Trees in Mumbai : वृक्षप्रेमी आणि पर्यावरण तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार महापालिका बनवणार वृक्ष लागवडीचा आराखडा

405
Fall of Trees in Mumbai : वृक्षप्रेमी आणि पर्यावरण तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार महापालिका बनवणार वृक्ष लागवडीचा आराखडा

मुंबईत झाडांची मोठ्या प्रमाणात होणारी पडझड लक्षात घेता महापालिका प्रशासनाने (Municipal Administration) ही पडझड कशी रोखावी याकरिता काही पर्यावरण प्रेमी आणि वृक्ष प्रेमींची बैठक घेतली. या बैठकीमध्ये या वृक्षप्रेमी आणि पर्यावरण प्रेमींनी महापालिकेला काही सूचना केल्या असून त्यानुसार आता महापालिका आराखडा तयार करून झाडा वृक्ष लागवडीचा विचार करणार आहे. मुंबईतील पर्यावरण संतुलन टिकवून ठेवण्यासाठी महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली आहे. मुंबईतील कुर्ला, पवई आणि बोरिवली ही तीन ठिकाणे मिळून तब्बल चार एकर क्षेत्रफळावर साडे तीन हजार वृक्षांची पारंपरिक पद्धतीने लागवड करण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिली. (Fall of Trees in Mumbai)

मुंबई महानगरातील झाडांची निगा कशी राखावी, त्यांचे संगोपन कसे करावे, वृक्षलागवड क्षेत्रात कोणकोणते अभिनव उपक्रम राबविण्यात येतील, झाडांची पडझड कशी रोखावी आदी विषयांवर उहापोह करण्यासाठी महानगरपालिकेचे आधिकारी आणि पर्यावरण क्षेत्रातील विविध संस्थांचे पदाधिकारी, पर्यावरणतज्ज्ञ आदींची महानगरपालिका मुख्यालयात सोमवारी २२ जुलै २०२४) बैठक पार पडली. या बैठकीत मार्गदर्शन करताना महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी बोलत होते. अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, सह आयुक्त (आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, उप आयुक्त (उद्याने) किशोर गांधी, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी आदींसह ‘प्रोजेक्ट मुंबई’चे शिशिर जोशी, पार्ले वृक्ष मित्र संघटनेचे अनिकेत करंदीकर, फ्रेंड्स ऑफ ट्रीजचे डॉ. अशोक कोठारी, तुषार देसाई, अदिती काणे, उद्यानविज्ञातज्ज्ञ रॉबर्ट फर्नांडिस, अनिल राजभर, ‘हरियाली’चे आठल्ये, ‘वातावरण फाउंडेशन’चे भगवान केशभट, ‘मिशन ग्रीन मुंबई’चे सुभाजित मुखर्जी, ‘मियाम ट्रस्ट’चे नितू जोशी, ‘नेचर फॉरेवर’चे मोहम्मद दिलावर, ‘मेगा फाउंडेशन’च्या अनुषा अय्यर आदींसह विविध पर्यावरणविषयी संस्थांचे पदाधिकारी, पर्यावरणतज्ज्ञ या बैठकीला उपस्थित होते. (Fall of Trees in Mumbai)

(हेही वाचा – Bigg Boss 3 OTTशो तातडीने बंद करा, मनिषा कायंदे यांचे मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार!)

बैठकीत सुचवले हे पर्याय 

यावेळी मार्गदर्शन करताना आयुक्त गगराणी म्हणाले, मुंबईत अनेक ठिकाणी पुरातन वृक्ष आहेत. त्यांचे संगोपन करण्यासाठी महानगरपालिका विविध उपक्रम राबवित आहे. धोकादायक ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांची शास्त्रोक्त पद्धतीने छाटणीही वेळच्यावेळी करण्यात येते. यासह अधिकाधिक ठिकाणी वृक्षांची लागवड कशी वाढविता येईल, यासाठी देखील महानगरपालिका (BMC) प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईत तीन मोठ्या भूखंडांवर वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. यासाठी कुर्ल्यातील चांदिवली, तसेच पवई आणि बोरिवली या तीन ठिकाणी मोठे भूखंड वृक्ष लागवडीसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. हे तीन ठिकाणे मिळून चार एकर भूखंडावर साडे तीन हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे. या झाडांची निवड कशी करावी, त्यासाठी कोणती शास्त्रोक्त पद्धत वापरावी, त्यांचे आयुर्मान वाढवावे यासाठी कोणती काळजी घ्यावी, याबाबत महानगरपालिका आराखडा तयार करीत आहे. यासाठी पर्यावरणतज्ज्ञांनी मत नोंदवावे, असे आवाहन गगराणी यांनी केले. महानगरपालिका कार्यक्षेत्रात आणखी २९ ठिकाणी वृक्षलागवड करण्यात येणार असल्याचेही गगराणी यांनी नमूद केले. (Fall of Trees in Mumbai)

पर्यावरण अभ्यासकांनी विविध विषयांवर बैठकीत मते मांडली. मुंबईतील झाडांचे आयुर्मान कसे वाढवावे, झाडांची छाटणी करताना घ्यावयाची काळजी, पुरातन झाडांचे जतन कसे करावे, दुभाजकांमध्ये कोणती झाडे लावावीत आणि ती लावताना कोणती काळजी घ्यावी, झाड दत्तक घ्यावे, ‘एक डॉक्टर-एक झाड दत्तक’ उपक्रम राबवावा, महानगरपालिकेच्या उद्यानांमध्ये पक्ष्यांसाठी बारमाही पाण्याची सोय करावी, उड्डाणपुलांखाली जागेचा वापर वृक्षलागवडीसाठी करावा, नागरी वने (मियावाकी) वाढवावीत, शाळांमध्ये जनजागृती करावी, एनसीसीच्या विद्यार्थ्यांचा वृक्षरोपणात सहभाग वाढवावा आदी विविध पर्याय सुचविले. या पर्यायांचा विचार करून महानगरपालिका वृक्षलागवडीसाठी त्याचा उपयोग करणार, असे उद्यान उप आयुक्त किशोर गांधी यांनी प्रशासनाच्या वतीने आश्वस्त केले. (Fall of Trees in Mumbai)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.