बापरे! १३० कोटींहून अधिक रकमेची खोटी देयके! व्यापाऱ्याला जीएसटी विभागाकडून अटक!

ओमप्रकाश तिरथदास सचदेव, यास मुख्य न्यायदंडाधिकारी, पुणे यांच्या न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

104

महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने कर चुकवेगिरी करणाऱ्या करदात्यांविरोधात आपली कार्यवाही चालू आहे. १३० कोटींपेक्षा जास्त रकमेची खोटी देयके दिल्याप्रकरणी ओमप्रकाश तिरथदास सचदेव या व्यापाऱ्यास राज्य जीएसटी पुणे विभागाकडून २२ जून २०२१ रोजी पुणे येथून अटक करण्यात आली असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकान्वये सहायक राज्यकर आयुक्त बी.व्ही. जुंबड यांनी दिली आहे.

बोगस १० कंपन्या स्थापन केल्या!

ओमप्रकाश तिरथदास सचदेव यांनी मे. श्री वाहेगुरु ग्लोबल माईन्स प्रायव्हेट लिमिटेड, ही कंपनी त्याच्या स्वतःच्या नावे तसेच मे. ट्रेडर्स भावरे, में. प्रकाश ट्रेडर्स, में. अगरवाल इंटरप्रायजेस, में. कोल्हे सेल्स, में. किरण ट्रेडिंग कंपनी, में. नारायण ट्रेडर्स, में. काशमोरा ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड, में. मरीकम्बा ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड, में सिओसिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्या इतर व्यक्तीच्या नावे स्थापन करून वस्तू व सेवाकर अधिनियम २०१७ अंतर्गत नोंदणी दाखले घेतले.

(हेही वाचा : पुण्याच्या आंबिल ओढा येथे स्थानिकांचा आक्रोश! काय आहे प्रकरण?)

बोगस खरेदी देयके दाखवली!

या कंपन्याच्या माध्यमातून ओमप्रकाश तिरथदास सचदेव याने १३०.०५ कोटी रकमेची खोटी देयके देऊन १९.७९ कोटींचा इनपुट टॅक्स क्रेडिट पुढील खरेदीदारांना दिला. त्याचप्रमाणे हा कर भरायला लागू नये यासाठी अनेक बोगस कंपन्यांकडून कोणत्याही वस्तू व सेवेच्या प्रत्यक्ष पुरवठ्याशिवाय दाखवलेल्या बोगस खरेदी देयकांतून सुमारे २२.४८ कोटी रकमेचा इनपुट टॅक्स क्रेडिट प्राप्त करून घेतला. हे कृत्य हे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अधिनियमाच्या कलम १३२ (ब) व (क) प्रमाणे गुन्हा असून १३२ (५) प्रमाणे दखलपात्र व अजामीन पात्र आहे. तसेच कलम १३२(१) (i) प्रमाणे सदरहू गुन्ह्यासाठी पाच वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद आहे.

आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी!

ओमप्रकाश तिरथदास सचदेव, यास मुख्य न्यायदंडाधिकारी, पुणे यांच्या न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याच कारवाई दरम्यान अशा प्रकारच्या बोगस कंपन्यांची माहिती पुणे राज्य वस्तू व सेवाकर विभाग यांना मिळालेली असून त्यांच्याविरुद्ध नजीकच्या कालावधीत कारवाई करण्यात येणार आहे. अपर राज्यकर आयुक्त धनंजय आखाडे आणि राज्यकर सहआयुक्त रेश्मा घाणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, राज्यकर उपायुक्त दि.भा. देशमुख, सहायक राज्यकर आयुक्त बाबासाहेब जुंबड यांच्या प्रयत्नातून ही अटक कार्यवाही झाली असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकान्वये सहायक राज्यकर आयुक्त बी.व्ही. जुंबड यांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.