मालाड मार्वे रोडच्या रुंदीकरणाचा मार्ग अडवला ‘फादर बंगलो’ने; एकमेव बांधकामाने मालाडकर जनतेची गती केली संथ

217
मालाड मार्वे रोडच्या रुंदीकरणाचा मार्ग अडवला 'फादर बंगलो'ने; एकमेव बांधकामाने मालाडकर जनतेची गती केली संथ
मालाड मार्वे रोडच्या रुंदीकरणाचा मार्ग अडवला 'फादर बंगलो'ने; एकमेव बांधकामाने मालाडकर जनतेची गती केली संथ

मालाड पश्चिम येथील मार्वे रोडवर वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरुपी तोडगा काढत यावरील अतिक्रमणे हटवून हा मार्ग रुंद करण्याची कामे हाती घेतली असून या मार्गावर मालवणी चर्च मधील फादर बंगलो हा या रुंदीकरणात प्रमुख अडसर ठरत आहे. मागील अनेक महिन्यांपासून हे अतिक्रमण हटवण्यासंदर्भात महापालिकेच्यावतीने कारवाई सुरू असून संबंधित चर्च मधील फादर बंगलो तोडल्यानंतर याकरिता आवश्यक नुकसान भरपाई सुद्धा महापालिकेने देण्याचे तयारी दर्शवली आहे. मात्र त्यानंतरही आवश्यक ती कागदपत्रे संबंधित चर्च व्यवस्थापनाकडून महापालिकेला सादर केली जात नाही. त्यामुळे महापालिकेने पुन्हा या चर्च व्यवस्थापनाला पत्र पाठवून आवश्यक ती कागदपत्रे सादर करण्याचे पत्राद्वारे कळवले आहे. त्यामुळे ही कागदपत्रे सादर झाल्यानंतर पुढील आठवड्यापर्यंत ही कारवाई होण्याची शक्यता असून त्यानंतर या मार्गावर विशेषतः शनिवार आणि रविवार होणारी वाहतूक कोंडी आता यापुढे मालाडकरांना सहन करावी लागणार नाही.

मालाड पश्चिम मालवणी मार्वे रोड हा मुंबई शहराच्या पश्चिम उपनगरातील एक प्रमुख रस्ता आहे. या मार्गावर अनेक वर्षांपासून बांधकामे उभी राहिली असून या अतिक्रमणामुळे रस्त्याची रुंदी कमी होऊन या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यातच शनिवारी आणि रविवारी होणाऱ्या या मार्गावरील वाहतूक कोंडीमुळे मालाडकर प्रचंड त्रस्त झाले असून या दोन्ही दिवशी घरातून बाहेर पडणेही मुश्किल बनले आहे. घरापासून रेल्वे स्थानक गाठण्यासाठी एक ते दोन तास लागत असल्याने हा मार्ग रुंदीकरण करण्याची मागणी रहिवाशांकडून होत आहे. त्यामुळे या मार्गावरील अतिक्रमण पी उत्तर विभागाच्या वतीने काढण्यात आली असून संपूर्ण मार्गावरील अतिक्रमण काढून या मार्गाचे रुंदीकरण केल्यानंतर मालवणी चर्च येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या चर्चला लागून एक बांधकाम आहे ते या रस्ता रुंदीकरणात बाधित होत आहे. चर्चपासून काही अंतरावर हे बांधकाम आहे. हे बांधकाम फादर बंगलो असून रस्त्याच्या रुंदीकरणात हे बाधित बांधकाम येत असल्याने महापालिकेने हे बांधकाम तोडून याची जागा रस्ते रुंदीकरणासाठी महापालिकेला हस्तांतरित करण्यासाठी १ कोटी ६२ लाख १४ हजार १३२ रुपये एवढी नुकसान भरपाई देण्याची तयारी दर्शवली आहे. या विरोधात चर्च व्यवस्थापन हे न्यायालयात गेल्यानंतर हा निकाल महापालिकेच्या बाजूने लागला. त्यानंतरही महापालिकेने न्यायालय जो निर्णय देईल त्यानुसार नुकसान भारपाईची रक्कम दिली जाईल अशी भूमिका घेतली. त्यानुसार २४ मे २०२४ रोजी महापालिका पी उत्तर विभागाच्यावतीने संबंधितांना पुन्हा नोटीस पाठवून जमीन हस्तांतरित करण्यासाठी कागदपत्रे सादर करण्याची सूचना केली आहे.

(हेही वाचा – BMC : मुंबईतील २८ रस्त्यांवर बसवणार नवीन वाहतूक सिग्नल)

मालाड/मालवणी येथील रहिवाशी व इतर प्रवाशांना होणारी वाहतूक कोंडी आणि त्रास लक्षात घेता मार्वे रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. या रुंदीकरणाच्या कामामुळे अनेक करदात्या नागरिकांना दिलासा मिळेल आणि त्यांचा मौल्यवान वेळ वाचेल, जो सध्या रस्त्याच्या वाहतुकीच्या कोंडीत वाया जात आहे. लगतच्या शाळेतील मुलांनाही याचा त्रास सहन करावा लागत असल्याने या मार्गाच्या रुंदीकरणाचे काम महापालिकेच्या वतीने हाती घेण्यात आहे. त्यातील बहुतांशी काम पूर्ण झाले असून मालवणी चर्च परिसरातील फादर बंगलोचे बांधकाम बाधित होत असल्याने संबंधितांना हे काम तोडून महापालिकेला जमीन हस्तांतरित करण्याची सूचना केली. हे बांधकाम बाधित होत असल्याने त्यांना आर्थिक नुकसान भरपाई दिली जाणार असून त्याची रक्कमही निश्चित करण्यात आली आहे. या मार्गावरील काही शिल्लक बांधकामे २३ मे रोजी तोडण्यात आल्यानंतर शिल्लक राहिलेले हे एकमेव बांधकाम तोडण्यासाठी संबंधितांना आणखी एक स्मरण पत्र पाठवून या बाधित होणाऱ्या बांधकामाची कागदपत्रे सादर करण्याची सूचना केल्याची माहिती पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात हे बांधकाम तोडून मार्वे रोड अतिक्रमण मुक्त करून रुंद केला जाईल. ज्यामुळे मालाडकर जनतेला या मार्गावरून सुरळीत प्रवास करता येईल आणि शनिवार व रविवारी होणाऱ्या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागणार नाही. सध्या या एकमेव चर्च भागातील बाधित बांधकामामुळे हे रुंदीकरण थांबले असून हे बांधकाम हटल्यास या मार्गावरील वाहतूक कोंडी कायमची दूर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

संबंधितांनी कागदपत्रे सादर केल्यानंतर हे बांधकाम तोडल्यानंतर या रस्त्याच्या बांधकामाचे काम आगामी पावसाळ्यापूर्वी पूर्ण करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मालवणी अग्निशमन दलापासून लोटस तलावापर्यंत अनेक अडथळे दूर करण्यात आले आहेत. त्यानंतर येथील रस्ता, पर्जन्य जलवाहिनी आणि पदपथाचे काम पूर्ण केली जात आहेत.

वाहतूक कोंडीचा जनतेच्या आरोग्यावर होतोय परिणाम

रस्त्यावरील वाहतूक कोंडीमुळे लोकांचा वेळ अधिक खर्ची होत आहे, तसेच प्रवासाचा खर्चही वाढत आहे. शिवाय इंधनाचा वापरही वाढतो आहे. परिणामी कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जन, बाहेरील वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषणात वाढ होते. ज्यामुळे शेवटी आसपासच्या भागात हवेची गुणवत्ता खराब होऊन आणि आसपासच्या रहिवाशांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.