भांडुप संकुलात पावसाळी पाणी शिरण्याची भीती, पंपांची केली अतिरिक्त व्यवस्था

तलाव आणि धरणांमधील पाणी भांडुप जलशुध्दीकरण केंद्रात शुध्द करून मुंबईकरांना पाणीपुरवठा केला जातो. या केंद्रात पावसाचे पाणी शिरल्याने विद्युत पुरवठा खंडित झाल्याने, तसेच पंप बंद पडल्याने मागील जुलै महिन्यात आठ दिवस पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला होता. परंतु यावेळच्या पावसाळ्यात सुरक्षेच्या उपाययोजना केल्या असल्या, तरीही अधिक काळजी घेण्याच्या दृष्टीकोनातून महापालिकेने या संकुलात पाण्याचा उपसा करणारे १८ पंप बसवले आहेत. त्यामुळे मागील वर्षीप्रमाणे पावसाळी पाण्यामुळे दुघर्टना घडल्यास आवश्यक पंप सुरू केले जाणार आहेत.

पाणी आणि वीजपुरवठ्यावर परिणाम

गेल्या वर्षी भांडुप जलशुद्धीकरण संकुलातील गाळणी आणि उदंचन संयंत्रांमध्ये डोंगरावरून वाहून येणारे पावसाचे पाणी शिरले होते. त्यामुळे तांत्रिक समस्या उद्भवल्याने येथील विद्युत पुरवठा देखील खंडित करावा लागला होता. परिणामी मुंबईचा पाणीपुरवठा खंडित झाला होता. यामध्ये प्रामुख्याने शहर आणि पश्चिम उपनगरात पाणीपुरवठा होऊ शकला नव्हता. पूर्व उपनगरांमध्येही अंशतः पाणीपुरवठा करण्यात येत होता. त्यानंतर या संकुलात शिरलेले पावसाचे पाणी अक्षरशः युद्ध पातळीवर उपसून गाळणी व उदंचन यंत्रणा परिसरामध्ये स्वच्छता करण्यात आली व त्यानंतर पंपांची दुरुस्ती करण्‍यात आली. यानंतर आवश्यक ती सर्व तांत्रिक कार्यवाही करून उदंचन करणारे पंप टप्‍प्‍या-टप्‍प्‍याने सुरू करून, मुंबईचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला होता. पण यामध्ये तब्बल आठ दिवस पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला होता.

(हेही वाचाः मान्सूनला विलंब? ‘या’ तारखेला होणार राज्यात आगमन)

म्हणून साचले पाणी

डोंगरावरून येणारे पावसाचे पाणी संकुलात न शिरता तेथील अस्तित्वात असलेल्या पर्जन्य जलवाहिनीतून विहार तलावात जायचे. परंतु मध्य वैतरणा आणि प्रस्तावित गारगाई धरणातून मिळणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी संकुलात दुसरे जलशुध्दीकरण केंद्र बांधण्यात आले. या दुसऱ्या जलशुध्दीकरण केंद्राच्या बांधकामामध्ये तिथे अस्तित्वात असलेल्या जुन्या दोन्ही पर्जन्य जलवाहिनी काढून टाकण्यात आल्या आहेत. परंतु त्याची पर्यायी व्यवस्था न केल्याने मागील वर्षी ही दुर्घटना घडल्याचे बोलले गेले होते. यापूर्वी डोंगरावरून वाहून येणारे पाणी रस्त्यावर वाहत जायचे, पण रस्त्यावर जाण्याचा मार्ग न मिळाल्याने हे पाणी संकुलात शिरल्याचेही बोलले जात होते.

१८ पंप बसवणार

परंतु यावेळी संरक्षक भिंत बांधल्याने याठिकाणी पाणी शिरण्याचा प्रकार कमी होईल. परंतु तरीही सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या संकुलात पाण्याचा उपसा करणारे १८ पंप बसवण्यात येत आहेत. या पंपांची व्यवस्था करण्यात आल्याने यंदाच्या पावसाळ्यात डोंगरावरुन पाणी वाहून आल्यास या पाण्याचा निचरा करण्यासाठी हे पंप टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येतील,असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

(हेही वाचाः राज्यात नवीन १२ संवर्धन राखीव क्षेत्रासह, ३ अभयारण्ये घोषित!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here