कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉन स्ट्रेनची धास्ती आता सर्वासामान्यांनी घेतल्याचे दिसून येत आहे. ओमिक्रॉनची दहशत सोलापूरात पसरल्याने लसीकरणाला तरुणाची गर्दी होत आहे. त्यामुळे लस घेण्यासाठी दाराशा केंद्रावर नागरिकांनी धावपळ केली. जिल्ह्यात अद्याप २९ टक्के लोकांनी कोरोनाची लस घेतली नसल्याचे दिसून आले आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या ओमिक्रॉन स्ट्रेनने जगाची चिंता वाढवली आहे. राज्य सरकारने गंभीर दखल घेत निर्बंध लादण्यास सुरूवात केली आहे. पुन्हा मास्कची सक्ती व फिजिकल डिस्टन्सबाबत जागृती करण्यात येत आहे.
लस नाही तर सरकारी सवलती, पगार बंद
कोरोनाची लस न घेणाऱ्यांना सरकारी सवलती, पगार बंद व सरकारी कार्यालयात प्रवेश बंदची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे लस न घेणारे सतर्क झाल्याचे दिसत आहे. आतापर्यंत मी आजारी आहे, इंजेक्शनची भीती वाटते, लस घेतल्यावर त्रास होईल अशी कारणे सांगणारे आता लसीकरण केंद्राकडे धाव घेत असल्याचे दिसून आले. साेलापुरातील दाराशा येथील केंद्राला दुपारी साडेबारा वाजता भेट दिली असता लसीकरणासाठी दोन रांगा लागल्याचे दिसून आले. यात तरुण व महिलांचा मोठा सहभाग दिसून आला. गेल्या तीन दिवसांपासून गर्दी वाढल्याचे येथील आरोग्य अधिकारी डॉ. सुहासिनी वाळवेकर यांनी सांगितले.
म्हणून नागरिकांनी केली पळापळ
लसीकरणासाठी हर घर दस्तक मोहीम घेतली होती. मोहिमेचा आज शेवटचा दिवस होता. घरोघरी आरोग्य कर्मचारी गेले पण लोकांनी कारणे सांगितली. यापुढे लस मिळणार नाही असा इशारा दिला होता. अशात नव्या स्ट्रेनची चर्चा सुरू झाली व पगार, शासकीय योजना बंद होणार हे समजताच लोक स्वत:हून येत आहेत.
Join Our WhatsApp Community