कोरोना टेस्ट से नहीं क्वारंटाईन से डर लगता है बाबू!

काही जण लक्षणं असतानाही अनेकांच्या संपर्कात येत आहेत. त्यामुळे एकूणच ही परिस्थिती कोरोना से डर नही लगता साहेब, कॉरंटाईनसे लगता है अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे.

102

संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचे आकडे वाढू लागले असून, आता तर कोरोनाचा रोजचा आकडा ४० हजारांवर पोहोचला आहे. मात्र तरी देखील आज अनेक रुग्ण हे लक्षणं असताना सुद्धा फक्त क्वारंटाईन व्हावे लागते या एकमेव कारणामुळे कोरोनाची टेस्ट करत नसल्याचे काही डॉक्टरांनी हिंदुस्थान पोस्टशी बोलताना सांगितले. काही डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, बऱ्याच लोकांमध्ये क्वारंटाईन होण्याची भीती निर्माण झाल्याने सर्व लक्षणे असून देखील या व्यक्ती कोरोना टेस्ट करणे टाळत आहेत. एवढेच नाही तर काही जण लक्षणं असतानाही अनेकांच्या संपर्कात येत आहेत. त्यामुळे एकूणच ही परिस्थिती कोरोना से डर नही लगता साहेब, क्वारंटाईनसे लगता है अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे.

ही मानसिकता कधी बदलणार?

शहरी भागासह ग्रामीण भागात देखील सुपर स्प्रेडर रुग्णांना शोधण्याची मोहीम हाती घेतली गेली आहे. यासाठी प्रत्येकाची तपासणी करण्याच्या सूचना आहेत. मात्र कोरोनाचा रिपोर्ट हाती येताच पॉझिटिव्ह रुग्ण घाबरुन उपचार घेण्यास टाळत असल्याचे समोर येत आहे. एवढेच नाही तर रिपोर्ट मिळाल्यानंतर पॉझिटिव्ह आलेला व्यक्ती हा रिपोर्ट मान्य करायला तयारच नसतो. यातून पुन्हा तो आपल्या कामाला लागतो. पॉझिटिव्ह रिपोर्टनंतरही तो अनेकांच्या संपर्कात येतो. यामुळे कोरोनाची रुग्णसंख्या वाढण्याचा धोका वाढला आहे. राज्यातील काही शहरांत तर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाच्या कार्यालयापर्यंत न पोहोचणाऱ्या रुग्णांची यादी पोलिस विभागाकडे दिली आहे. अशा रुग्णांवर उपचार करण्यासाठी पोलिसांची मदत मागविण्यात आली आहे.

(हेही वाचाः गावातही चालला कोरोना… विदर्भात रुग्णसंख्या का वाढतेय? अमरावती जिल्ह्याचा आढावा)

घाबरुन टेस्ट न करता आयसीयू बेडची वाट बघण्यापेक्षा आधीच कोरोना टेस्ट करा आणि औषधं घ्या. एका व्यक्तीच्या चुकीमुळे १० जणांना कोरोना होऊ शकतो. हा आजार लपवण्यासारखा नाही पण दुर्दैवाने आज तसे प्रकार घडत आहेत. परिणामी कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. काही असे पेशंट आहेत की ज्यांना १० दिवस ताप असताना देखील सांगत नाहीत, नंतर ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्यावर उपचार करतात. अशावेळी डॉक्टर देखील काही करू शकत नाहीत.

डॉ. गौरव, फोरटीज हॉस्पिटल

आज महाराष्ट्रात बरेच रुग्ण हे जाऊन तपासणी करत आहेत. पण हे देखील खरं आहे की काहीजण हा आजार नवीन असल्याने घाबरत आहेत. घाबरुन काहीजण टेस्ट देखील करत नाहीत. मात्र लोकांनी भीती काढून टाकावी. पहिल्या टप्प्यात देखील लोकांनी हीच चूक केली, परिणामी रुग्ण वाढू लागले. आता तशी चूक करू नका जर वेळीच टेस्ट आणि उपचार झाले तर ते तुमच्यासाठी आणि आजूबाजूच्या लोकांसाठी हिताचे आहे.

-डॉ. समीर दलवाई

कुणीही घाबरण्याचे काहीच कारण नाही. टेस्ट करून घेणे आणि उपचार करणे हाच ही साखळी तोडण्याचा उपाय आहे. जर हा आजार लपवलात या आजाराचा अंत नाही. त्यामुळे लक्षणं आढळली की लगेच टेस्ट करून उपचार करुन घ्या.

-राहुल घुले, डॉ. वन रुपी क्लिनिक

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.