कोकण विभागात उत्तरेहून वाहणा-या थंड वा-यांचा प्रभाव संपल्यानंतर किमान आणि कमाल दोन्ही तापमानाने उसळी घेतली आहे. मुंबईचे कमाल तापमान सरासरीपेक्षा सहा अंशाने वाढले असून आता आठवडाभर किमान तापमान २०-२१ तर कमाल तापमान ३६-३७ अंश सेल्सिअसवर राहील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. परिणामी, हिवाळी ऋतुमानाच्या अखेरचा महिना संपण्याअगोदरच आता मार्च हिटचा अनुभव मुंबईकरांना आठवडाभर सहन करावा लागणार आहे.
सोमवारी मुंबईतील किमान आणि कमाल दोन्ही तापमानात सरासरीपेक्षाही तब्बल सहा अंशाने जास्त वाढ झाली होती. रविवारी किमान तापमान १६.६ अंश सेल्सिअस तापमानावर असताना मुंबईकर गारेगार थंडीचा अनुभव घेत होते. सोमवारी सकाळी अचानक वातावरणात बदल झाल्याने प्रभातफेरीसाठी बाहेर पडलेली माणसे, शाळकरी विद्यार्थ्यांना थंडी आता नाहीशी होत असल्याची जाणीव झाली. सायंकाळी कमाल तापमान थेट ३७.३ अंश सेल्सिअसवर नोंदवले गेल्याने तापमानवाढीने गरमीचाही अनुभव आला. सोमवारचे कमाल तापमान २०२१ नंतरचे फेब्रुवारी महिन्यातील सर्वात जास्त कमाल तापमान होते. २०२१ साली २२ फेब्रुवारी रोजी मुंबईतील कमाल तापमान ३६.३ अंश नोंदवले गेले.
( हेही वाचा: Malad Fire: मालाड येथील झोपडपट्टीला भीषण आग; एका मुलाचा मृत्यू )
पुढील सात दिवस कमाल तापमानाचा अंदाज (अंश सेल्सिअसमध्ये)
तारीख ० किमान तापमान ० कमाल तापमान
१३ फेब्रुवारी २१ ३७
१४ फेब्रुवारी २० ३६
१५ फेब्रुवारी २१ ३७
१६ फेब्रुवारी २१ ३७
१७ फेब्रुवारी २१ ३७
१८ फेब्रुवारी २१ ३७
१९ फेब्रुवारी २१ ३७