जागेवरून लोकलच्या महिला डब्यात राडा, मायलेकिंनी महिला प्रवाशासह पोलिसाला केली मारहाण

143
ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल ट्रेनच्या महिला डब्यात बसण्याच्या जागेवरून महिलांमध्ये हाणामारी झाल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या हाणामारीत एक महिला पोलीस आणि एक महिला प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर नेरुळ येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी ठाणे ते पनवेलच्या दरम्यान घडली असून याप्रकरणी वाशी लोहमार्ग पोलिसांनी काही महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

महिलेला मारहाण करण्यास सुरुवात

ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे-पनवेल या लोकलच्या महिला डब्यातून माय लेकी आणि नात असे तिघे जण आसनावर बसून प्रवास करीत होत्या, या दरम्यान कोपरखैरणे येथून एक महिला चढली व तिने या तिघींना बसण्यासाठी जागा द्या असे सांगितले असता या मायलेकिनी या प्रवासी महिलेला जागा देण्यास नकार दिल्यामुळे त्याच्यात शाब्दिक भांडण सुरू झाले. हे भांडण हाणामारीपर्यंत गेले व माय लेकींनी कोपरखैरणे येथे ट्रेनमध्ये चढलेल्या महिलेला मारहाण करण्यास सुरुवात केली.

एकीला अटक केली

इतर महिला प्रवासी या महिलेच्या बचावासाठी पुढे आल्या मात्र या मायलेकींना या प्रवासी महिलेला मारहाण सुरू ठेवली होती, अखेर नेरुळ स्थानक येताच एक महिला पोलीस कॉन्स्टेबल डब्यात आली व तिने या मायलेकिंना अडविण्याचा प्रयत्न केला असता या मायलेकिंनी महिला पोलिसाला मारहाण करून ट्रेनच्या रॅकवर लोटले, त्यात महिला पोलीस हिच्या कपाळाला स्टीलचा रॅक लागल्यामुळे मोठी जखम होऊन रक्तस्त्राव सुरू झाला. अखेर या महिला पोलिसाने अधिक मदत मागवून या मायलेकींना ताब्यात घेऊन जखमी प्रवासी महिला आणि पोलीस कॉन्स्टेबल यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून वाशी लोहमार्ग पोलीस ठाण्यात या मायलेकीविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण करून जीवे मारण्याची धमकी देणे, मारहाण करणे प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एकीला अटक केली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ट पोलीस निरीक्षक संभाजी कटारे यांनी दिली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.