मध्य रेल्वेच्या प्रवाशांनो, आता टेन्शन घेऊ नका, सुसाट प्रवास करा…

134

मध्य रेल्वेच्या प्रवाशांना ठाणे ते दिवा दरम्यानचा अडथळा कायम खुपत असायचा, सीएसमटीवरून धाडधाड करत ठाण्यात पोहोचायचे आणि रेल्वे ट्रकच्या अभावी पासिंगसाठी ताटकळत राहायचे, हे नित्याचे बनले होते, पण आता टेन्शन नॉट! मागील ७२ तासांचा मेगा ब्लॉक सहन केलात ना, आता आयुष्यभराची किटकिट संपली आहे. मंगळवार, ८ फेब्रुवारीपासूनच मध्य रेल्वेच्या प्रवाशांचा प्रवास आता सुसाट सुरु झाला आहे.

सीएसएमटीमधून सुटणाऱ्या व त्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकल, मेल, एक्स्प्रेस गाडय़ांना ठाणे ते दिवादरम्यान स्वतंत्र मार्गिका उपलब्ध नसल्याने कायमी रखडत असायच्या. त्यामुळे मध्य रेल्वेच्या लोकल कायम १०-१५ मिनिटे उशिरा धावत असायच्या. लोकल, लांब पल्ल्यांच्या गाडय़ांचा वेग मंदावत असल्याने प्रवाशांना मनस्ताप होत होता. आता हा प्रवास विनाअडथळा होणार आहे.

(हेही वाचा कर्नाटकात मुस्लिम विद्यार्थिनी हिजाबवर आग्रहीच! वाद पेटला, ड्रेस कोडची ऐशी तैशी)

ठाणे-दिवा स्थानकादरम्यान एक्स्प्रेस गाडय़ांसाठी संपूर्ण पाचवी व सहावी मार्गिका उपलब्ध होत आहे. यातील सहाव्या मार्गिकेसाठी ७२ तासांचा ब्लॉक सोमवारी मध्यरात्रीपर्यंत सुरू होता. यात मोठ्या प्रमाणात कामे पूर्ण करण्यात आली. २३ जानेवारीला १४ तासांचा ब्लॉक घेतल्यानंतर पाचवी मार्गिका सुरु झाली होती.

२००९ ला कामाला मिळालेली मंजुरी 

मेल, एक्स्प्रेस गाड्यांसाठी सध्या ठाणे ते कुर्लापर्यंत आणि दिवा ते कल्याणपर्यंत पाचवी, सहावी स्वतंत्र मार्गिका आहे. ठाणे ते दिवा दरम्यान ही मार्गिका नसल्याने जलद लोकलच्या उपलब्ध दोन मार्गिकांवरूनच मेल, एक्स्प्रेसही जात होत्या. ठाणे ते दिवादरम्यान अप व डाऊन जलद मार्गिकेवर मेल, एक्स्प्रेस किंवा लोकल गाडीला प्राधान्य देताना यातील काही सेवांना अर्धा ते पाऊण तास थांबवलेही जात होते. यामुळे काही वेळा जलद लोकलबरोबरच मेल, एक्स्प्रेसच्या वेळापत्रकाचा बोजवारा उडत होता. त्यावर कायमस्वरुपी तोडगा काढला आहे.  २००८-०९ साली या मार्गिकेला मंजुरी मिळाल्यानंतर अन्य प्रक्रिया पूर्ण करुन कामाला सुरुवात करण्यात आली. परंतु मार्गिका उपलब्ध होण्यासाठी २०२२ साल उजाडले.

लोकल फेऱ्या वाढणार 

मेल, एक्स्प्रेससाठी ठाणे ते दिवा स्थानकांदरम्यान पाचवी, सहावी मार्गिका सेवेत येणार असल्याने लोकलचे वेळापत्रकही सुधारेल़  त्यामुळे टप्प्याटप्याने सुमारे ८० लोकल फेऱ्या वाढवण्याचे नियोजन मध्य रेल्वे करत आह़े.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.