रॉयल्टी बुडविणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करा; महसूलमंत्री Chandrashekhar Bawankule यांचे आदेश

दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी

49
रॉयल्टी बुडविणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हे दाखल करा; महसूलमंत्री Chandrashekhar Bawankule यांचे आदेश
  • प्रतिनिधी

ठाणे महापालिका हद्दीत राबविण्यात आलेल्या भुयारी गटार योजनेत मातीची बेकायदेशीर वाहतूक करून राज्य सरकारची स्वामित्व धनाची रक्कम (रॉयल्टी) बुडविणाऱ्या ठेकेदाराच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सोमवारी दिले. याशिवाय याप्रकरणी दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी दिली. नुकत्याच पार पडलेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित करण्यात आलेल्या तारांकित प्रश्नाच्या अनुषंगाने बावनकुळे यांनी सोमवारी बैठक घेतली. या बैठकीत बोलताना बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी राज्य सरकारची फसवणूक करणाऱ्या कोणाचीही हयगय करणार नाही, असा इशारा दिला.

ठाणे महानगरपालिका हद्दीतील भुयारी गटार योजनेसाठी नेमलेले कंत्राटदार आनंद कंस्ट्रवेल यांनी मातीचे उत्खनन करून पुन्हा भरणी केल्यानंतर शिल्लक राहिलेल्या मातीची रॉयल्टी न भरता तसेच परवानगी न घेता मातीची बेकायदेशीर वाहतूक केली होती. या ठेकेदाराने सुमारे ४ हजार ६५२ ब्रास मातीच्या वाहतुकीपोटी ४ कोटी ८३ लाख ८० हजार ८०० रुपयांची रॉयल्टी बुडविल्याचेही निदर्शनास आले होते. यावरून महसूल मंत्र्यांनी सोमवारच्या बैठकीत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. सन २०१८ पासून संबंधित अधिकाऱ्यांना या विषयाची माहिती असतानाही कारवाईसाठी विलंब का झाला? असा सवाल करत बावनकुळे यांनी संबंधित ठेकेदारांकडून तातडीने दंडाची रक्कम वसूल करण्याचे निर्देश दिले.

(हेही वाचा – World Health Day : आहारातील मिठाचे प्रमाण नियंत्रित राखण्यासाठी महापालिकेकडून ‘मीठ व साखर जनजागृती अभियान’)

गैरकारभार आढळल्यास त्वरित कारवाई

ठाणे आणि मिरा-भाईंदरमध्ये अनेक नवीन बांधकामे परवानग्या न घेताच सुरु आहेत. तर जुन्या कामांना अधिकाऱ्यांकडून नोटीसा दिल्या जात आहेत. एकच फेरफार असणाऱ्या मिळकतदारांवर स्वामित्वाची रक्कम एकत्रित आकारली जात आहे. हे योग्य नसून याबाबत तातडीने कारवाई करावी आणि सरकारी जमीनींवर फलक लावून त्या ताब्यात घ्याव्यात, असे आदेश बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी अन्य एका बैठकीत दिले. याशिवाय आपण स्वतः मिरा-भाईंदरमधील कामांची पहाणी करणार असून दोषी आढळल्यास जागेवरच कारवाई करणार असल्याचा इशारा पाणी बैठकीत दिला.

ठाणे आणि मिरा-भाईंदर परिसरातील जुन्या लोकांच्या बांधकामाबाबत ज्या तक्रारी आहेत, त्या तातडीने मार्गी लावण्यासाठी लोक अदालतीचे आयोजन करण्यात यावे. या माध्यमातून सर्व तक्रारींचा निपटारा करावा. लोकप्रतिनिधी आणि लोकांच्या कोणत्याच तक्रारी येता कामा नयेत याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांना केल्या.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.