एमआयडीसीवर सायबर हल्ला करणा-या हॅकर विरोधात गुन्हा दाखल!

मुंबईतील सायबर गुन्हे शाखा येथे अज्ञात हॅकर विरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई पोलिस प्रवक्ते चैतन्य एस यांनी दिली आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ(एमआयडीसी)च्या सर्व्हरवर सायबर हल्ला करण्यात आला. हा सायबर हल्ला करणाऱ्या हॅकरने महत्वाच्या डेटामध्ये व्यत्यय निर्माण करुन ईमेलद्वारे खंडणीच्या स्वरूपात मोठ्या रकमेची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञात हॅकर विरोधात मुंबईतील सायबर गुन्हे शाखेत बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून, हॅकरची माहिती मिळवण्यात येत असल्याचे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

५०० कोटींची केली होती मागणी

एमआयडीसीच्या संगणकीय प्रणालीवर २९ मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सायबर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामुळे एमआयडीसीची संपूर्ण संगणक यंत्रणा बंद पडली. या सायबर हल्ल्यामुळे राज्यभरात असलेल्या एमआयडीसीच्या कार्यलयासह मुंबईतील मुख्यालयातील लोकल सर्व्हर सिस्टीम आणि डेटाबेस सेवांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. सायबर हल्लेखोराने एमआयडीसीकडे ईमेलद्वारे खंडणीच्या स्वरूपात ५०० कोटी रकमेची मागणी केली होती.

(हेही वाचाः एमआयडीसीचे सर्व्हर हॅक… काय आहे हॅकर्सची मागणी?)

अज्ञात हॅकरविरुद्ध गुन्हा दाखल

या सायबर हल्ल्यामुळे संगणकीय यंत्रणेत व्हायरसचा प्रसार होऊ नये यासाठी नेटवर्क वरून संगणक तातडीने काढून घेण्यात आल्यामुळे, होणारे मोठे नुकसान टाळता आले. अशी माहिती एमआयडीसी सूत्रांकडून देण्यात आली आहे. एमआयडीसीने एक खिडकी योजना, इआरपी, बीपीएएमएस, संगणकीय भू-वाटप प्रणाली व पाण्याचे बिल या यंत्रणेच्या बॅकअप फाईल्स वेगळ्या नेटवर्कवर संग्रहित करण्यात आलेल्या आहेत. त्या सुरक्षित असल्याची माहिती एमआयडीसी कडून देण्यात आली आहे. हॅकरने केलेल्या सायबर हल्ल्यामुळे अनेक ग्राहक, कर्मचारी यांना संगणकीय डेटा वापरता आलेला नसल्यामुळे मोठीच अडचण झाली होती. सदरचा हल्ला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू असून, यासाठी सायबर तज्ञांची मदत घेतली जात असल्याची माहिती एमआयडीसीकडून देण्यात आली आहे. याप्रकरणी मुंबईतील सायबर गुन्हे शाखा येथे अज्ञात हॅकर विरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई पोलिस प्रवक्ते चैतन्य एस यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here