मुंबई महापालिकेच्या २३६ प्रभागांचा प्रसिद्ध करण्यात आलेल्या रचनांबाबत नागरिकांकडून हरकती व सूचना जाणून घेत त्यावरील सुनावणीची प्रक्रिया राबवण्यात आल्यानंतर, हा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला २ मार्च रोजी सादर करणे आवश्यक होते. परंतु शिफारशीसह विवरण राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यास येत्या ५ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे प्रभागांच्या रचनेचे विवरण आता येत्या ५ मार्च रोजी राज्य निवडणूक आयोगाला सादर केले जाणार असून, पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये या अंतिम प्रभागांच्या सीमा राजपत्रात प्रसिध्द केल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
निवडणूक आयोगाला अहवाल सादर
मुंबई महापालिकेच्या २३६ प्रभागांच्या अंतिम आराखड्याला राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिल्यानंतर, राज्य निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्तांना शिफारस करत यासाठी हरकती व सूचना मागवण्यास सांगितले. त्यानुसार १ फेब्रुवारी रोजी याबाबतची अधिसूचना जारी करून २३६ प्रभागांची यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करून जनतेकडून हरकती व सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यानंतर २६ फेब्रुवारी पर्यंत हरकती व सूचनांची अंतिम सुनावणी करून याचा अहवाल २ मार्च रोजी शिफारशीसह विवरण राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात येणार होता.
( हेही वाचा: दाऊदच्या घरची धुणीभांडी आधी थांबवा…फडणवीसांचा हल्लाबोल )
लवकरच होणार प्रसिद्ध
परंतु आयोगाने हे विवरण सादर करण्यास अजून तीन दिवसांचा कालावधी वाढवून दिला असून, येत्या ५ मार्चपर्यंत हा अहवाल सादर केला जावा, अशा सूचना महापालिका निवडणूक विभागाला दिल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून प्रभागांच्या शिफारशींचे विवरण सादर करण्यास सर्वच महापालिका व नगरपालिकांना ५ मार्चपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेच्यावतीने हे विवरण आता २ मार्च रोजी सादर करण्यात आले नसून, आता ते ५ मार्च रोजी सादर केले जाणार आहे. त्यामुळे प्रभागांच्या सिमांकनाची अंतिम प्रक्रिया पूर्ण झाल्याने, निवडणूक आयोग त्यानंतर दोन ते तीन दिवसांमध्ये राजपत्रात प्रसिध्द करेल अशी माहिती मिळत आहे.
Join Our WhatsApp Community