अखेर महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप

111

मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांना शालेय साहित्यांच्या वाटपाला विलंब झाल्यानंतर अखेर शालेय साहित्यांचे वाटप अखेर विद्यार्थ्यांना करण्यात येत आहे. सोमवारपासून महापालिकेच्या कुलाबा ते लालबाग आदी भागांसह मुलुंडमधील शाळांमध्येही रेन कोटसह स्टेशनरीचा पुरवठा करण्यात आला आहे.

( हेही वाचा : अश्विनी भिडे यांच्यावर मुंबई मेट्रो रेलच्या व्यवस्थापकीय संचालक पदाची अतिरिक्त जबाबदारी)

मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांना २७ शालेय वस्तूंचे मोफत वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे प्रत्येक वर्षी शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच्या दिवशीच शालेय साहित्यांचे वाटप करण्यात येत होते. परंतु यावर्षी शाळा सुरु झाल्यानंतर एक महिना उलटून गेला तरीही शालेय वस्तूंचा पुरवठा विद्यार्थ्यांना होऊ शकला नव्हता. त्यामुळे महापालिका प्रशासनावर चौफेर बाजुंनी टिका होत होती.

विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप

भाजपच्यावतीने शालेय साहित्यांच्या वाटपाबाबत टिका होत असतानाच शुक्रवारी महापालिका आयुक्त व प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी शालेय वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या सर्व कंत्राटदारांची अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, सहआयुक्त अजित कुंभार, उपायुक्त रमाकांत बिरादर, शिक्षणाधिकारी कंकाळ आदींसह अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीमध्ये तात्काळ सर्व कंत्राटदारांना साहित्याचे वाटप करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले होते.

मात्र, सोमवारपासून दक्षिण मुंबईतील ए, बी,सी, डी आणि ई विभाग तसेच पूर्व उपनगरांमधील टी विभागातील शाळांमध्ये रेनकोट तसेच स्टेशनरी साहित्याचे वाटप करण्यात आले. महापालिका प्रशासनाने रेनकोट, स्टेशनरी आणि बूट आदींचे प्रस्ताव मंजूर केले होते, त्या मंजूर प्रस्तावांमधील साहित्याचे वाटप शाळांमधील विद्यार्थ्यांना करण्यात आले असून उर्वरीत शाळांनाही नियोजित वेळेपूर्वी देण्यात येणार असल्याचे शिक्षक विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

आवडीप्रमाणे छत्री खरेदी करता येईल

दरम्यान, महापालिका शाळांमधील मुलांच्या छत्री खरेदीच्या निविदेला विलंब झाल्याने या छत्री खरेदीला २७० रुपये देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार इयत्ता आठवी ते दहावीच्या मुलांना छत्रीकरता २७० रुपये छत्री खरेदीकरता विद्यार्थ्यांना मुख्यध्यापकांमार्फत वितरीत करण्यात आले असून या पैशांमधून मुलांना आपल्या आवडीप्रमाणे छत्री खरेदी करता येईल,असे सह आयुक्त अजित कुंभार यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.