भायखळा येथील रिचर्डसन अँड क्रुडास कोविड सेंटरमध्ये आता पाच ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार आहेत. गोरेगाव नेस्कोमध्ये सीएसआर निधीतून ऑक्सिजन प्लांट बनवण्यात आल्याने येथील प्रस्तावित केलेल्या प्लांटची संख्या कमी करुन, तेथील पाच प्लांट आता भायखळा येथील कोविड सेंटरमध्ये उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
इतके उभारणार ऑक्सिजन प्लांट
मुंबई महापालिकेच्यावतीने कोविडच्या तिसऱ्या लाटेला सामोरे जात असतानाच महापालिका रुग्णालये व जंबो कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारले जात असून, १२ रुग्णालयांमध्ये १६ ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभारण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानंतर जंबो कोविड सेंटरमधील ७० ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. मात्र, त्यातच सीएसआर निधीतून अनेक ठिकाणी ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आल्याने या कामांमधील काही कामे कमी करत ती कंत्राटातून वगळण्यात आली आहेत.
(हेही वाचाः दोन महिने उलटूनही केवळ ९ ऑक्सिजन प्लांटची उभारणी)
ही कंपनी उभारणार प्लांट
गोरेगावच्या नेस्को कोविड सेंटरमध्ये दहा प्लांट उभारण्यात येणार होते. परंतु याठिकाणीही सीएसआर निधीतून ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आल्याने येथील पाच प्लांट कमी करुन ते भायखळा येथील रिचर्डसन अँड क्रुडास कोविड सेंटरच्या जागी उभारण्याचा निर्णय घेतला. नेस्कोचे काम जी.एस.एन असोसिएट्स या कंपनीला मिळाले असून, त्यांच्यामार्फतच हे काम भायखळा येथील आर अँड सी कोविड सेंटरमध्ये उभारले जाणार आहे.
(हेही वाचाः मुंबईतील जंबो कोविड सेंटरमधल्या ऑक्सिजन प्लांटचा खर्च झाला कमी)
मागणीला वरिष्ठांची मंजुरी
यांत्रिक व विद्युत विभागाचे प्रमुख अभियंता कृष्णा पेरेकर यांनी यासंदर्भात बोलताना गोरेगाव नेस्कोमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठीची जागा कमी नसून, तिथे सीएसआर निधीतून प्लांट उभारण्यात आले आहेत. त्यामुळे महापालिकेच्यावतीने जे दहा प्लांट उभारण्यात येणार होते, त्यांची संख्या कमी करुन ते भायखळा येथील रिचर्डसन अँड क्रुडास येथील कोविड सेंटरमध्ये उभारण्यात येणार आहेत. याठिकाणी ऑक्सिजन प्लांटची मागणी होत होती आणि वरिष्ठांनीही याला मंजुरी दिल्याने तिथे पाच प्लांट उभारले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
(हेही वाचाः ऑक्सिजन प्लांट उभारणी: सीएसआर निधी रुग्णालयांमध्ये, महापालिकेचा निधी कोविड सेंटरमध्ये)
गैरसोय टाळण्यासाठी होत होती मागणी
मुंबईतील भायखळा येथील रिचर्डसन अँड क्रुडासमध्ये प्रशस्त असे मोठे कोविड सेंटर उभारले असले, तरी त्याठिकाणी ऑक्सिजनची सुविधा नव्हती. त्यामुळे आसपासच्या रुग्णांची मोठी गैरसोय व्हायची. त्यामुळे बऱ्याचदा रुग्णांना वरळी नॅशनल स्पोर्टस् च्या ठिकाणी असलेल्या कोविड सेंटरमध्ये किंवा बीकेसी जंबो कोविड सेंटरमध्ये दाखल करावे लागायचे. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख, काँग्रेस नगरसेविका सोनम मनोज जामसूतकर यांनी ऑक्सिजन प्लांटची मागणी लाऊन धरली होती. त्यामुळे अखेर याठिकाणी प्लांट उभारणीचा निर्णय घेण्यात आला आहे.
(हेही वाचाः ऑक्सिजन प्लांटसाठी आधी काढल्या निविदा, नंतर उभारले सीएसआर निधीतून!)
Join Our WhatsApp Community