वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक साहाय्य मिळावे, यासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या माध्यमातून २० प्रकारच्या गंभीर आजारांना मदत दिली जाते. गेल्या एका वर्षात मुख्यमंत्री सहायता निधी विभागाने राज्यातील १२ हजार ५०० रुग्णांना उपचारांसाठी आर्थिक मदत दिली आहे. यासाठी १०० कोटीपेक्षा अधिक अर्थसहाय्य वितरीत करण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
दुर्धर व गंभीर आजारांवर यशस्वी मात केलेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचा आनंद मेळा सह्याद्री अतिथीगृह येथे बुधवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या लाभार्थी रुग्णांसाठी मोबाईल अॅप तसेच व्हॉट्स अॅप हेल्पलाईनचे उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. वैद्यकीय मदत मार्गदर्शक ग्रंथाच्या पाचव्या आवृत्तीचे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेवर आधारित ’रोखठोक’ या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. वर्षभरातील आढावा घेणारी चित्रफीत दाखवण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे आम्हाला पुनर्जन्म लाभला अशी भावना सहायता कक्षाच्या लाभार्थ्यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामार्फत वर्षभरात रुग्णांना मदत करत करत शंभर कोटीचा आकडा कधी पोहोचला हे समजले सुद्धा नाही. राज्यातील प्रत्येक नागरिकाला सर्व शासकीय रुग्णालयांत मोफत तपासणी आणि उपचार देण्याचा महत्वपूर्ण निर्णय सरकारने घेतला आहे. या योजनेची अंमलबजावणी सुरु झाली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. म. फुले जीवनदायी आरोग्य योजनेत विमा संरक्षण दीड लाखांवरून ५ लाखांपर्यंत वाढविण्यात आला आहे. मी जेव्हा मदतीचा हात पुढे करतो तेव्हा यामध्ये मोजमाप करत नाही. कुठलाही घटक लाभापासून, योजनांपासून वंचित राहणार नाही, अशी हमी सरकारने घेतली असल्याचे शिंदे म्हणाले.
एक सही एखाद्याला उपचार देत असेल त्याचा जीव वाचत असेल तर मला अशा कितीही सह्या केल्या तरी कमीच वाटतात असेही शिंदे म्हणाले. अधिकारांचा वापर सर्वसामान्यांसाठी करतो. सामान्यांसाठी केलेल्या सह्या कमीच वाटतात. आपल्याला जो काही अधिकार प्राप्त झाला आहे त्याचा वापर सर्वसामान्य लोकांसाठी झाला पाहिजे असे शिंदे यांनी सांगितले. कोविड काळात आपली माणसे परकी झाली. या परिस्थितीमध्ये कोविड काळात एक टीम म्हणून आम्ही काम केले. संकटकाळात मदत करताना मोजमाप केले नाही. आता रखडलेले प्रकल्प पुढे नेण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
‘या’ आजारांच्या उपचारांसाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीची मदत घ्या –
रुग्णाचे रुग्णालयात उपचार सुरु करताच मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी अर्ज दाखल केल्यास आर्थिक तजवीज मिळताना अडचणी येत नाही. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर रुग्णाच्या आजाराविषयी तसेच आर्थिक तजवीज प्रकरणात शहानिशा करता येत नसल्याने या रुग्णांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून अर्थसहाय्य मिळत नाही.
मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी नोंदणीकृत रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना अर्थसहाय्य दिले जाते. मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळण्यासाठी नियुक्त वैद्यकीय समिती रुग्णाच्या तपशीलाची शहानिशा करते. नोंदणीकृत रुग्णालयांची यादी cmrf.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय समितीच्या शिफारशीनुसार २५ हजार, ५० हजार तसेच १ किंवा २ दोन लाखांपर्यंत रुग्णांच्या उपचारांसाठी रक्कम दिली जाते.
या आजारांसाठी मिळतो मुख्यमंत्री साहाय्यता निधी –
- कॉक्लियर इम्प्लांट (२ ते ६ वयोगटांसाठी)
- हृदय प्रत्यारोपण
- यकृत प्रत्यारोपण
- किडनी प्रत्यारोपण
- फुफ्फुस प्रत्यारोपण
- बोन मॅरो प्रत्यारोपण
- हाताचे प्रत्यारोपण
- हिप रिप्लेसमेंट
- कर्करोग शस्त्रक्रिया
- अपघात शस्त्रक्रिया
- लहान बालकांची शस्त्रक्रिया
- मेंदूचे आजार
- हृदयरोग
- डायलिसिस
- कर्करोग (केमोथेरपी, रेडिएशन)
- अपघात
- नवजात शिशूंचे आजार
- गुडघ्याचे प्रत्यारोपण
- अपघातात त्वचा भाजल्याने उपचार घेणारे रुग्ण
- विद्युत अपघाताचे रुग्ण
संपर्क क्रमांक – ०२२ – २२०२२६९४८
निधीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया –
अर्थसाहाय्याची मागणी ईमेलद्वारेही करता येते. त्यासाठी अर्जासह सर्व कागदपत्रे पीडीएफ स्वरुपात पाठवावी. कागदपत्रांच्या मूळ प्रती मुख्यमंत्री साहाय्यता निधीकडे टपालाद्वारे पाठवता येते.
ईमेल आयडी – [email protected]
(हेही वाचा – State Health Department : राज्याच्या आरोग्य विभागातील महत्वाची पदे रिकामी)
अर्जासोबत जोडायची कागदपत्रे –
- अर्ज, निदान व उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र (खासगी रुग्णालय असल्यास सिव्हिल सर्जनकडून प्रमाणपत्र प्रमाणित असावे), तहसिलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला (१ लाख ६० हजार पेक्षा कमी असणे आवश्यक आहे)
- महाराष्ट्र राज्यातील नागरिक असलेल्या रुग्णाचे आधारकार्ड, रेशनकार्ड लहान बाळासाठी आईचे आधारकार्ड.
- अपघातग्रस्त रुग्णांसाठी एमएलसी रिपोर्ट आवश्यक आहे.
- प्रत्यारोपण शस्रक्रियेच्या रुग्णांसाठी झोनल ट्रान्सप्लान्ट कोर्डिनेशन कमिटीची मान्यता बंधनकारक आहे.
- रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर उपलब्ध असल्याची खात्री करा.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community