भारतात दरवर्षी अपघातामुळे तब्बल २५ हजार जणांना हात गमवावे लागत असल्याची आकडेवारी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली आहे. देशात हाताचे प्रत्यारोपण उपलब्ध असले तरीही आर्थिक विमा योजनेचे कवच अद्याप शस्त्रक्रियेसाठी उपलब्ध नाही. राज्यातील मुख्यमंत्री सहाय्यता योजनेंतर्गत हाताच्या प्रत्यारोपणासाठी आर्थिक मदत दिली जाते. परंतु खासगी रुग्णालयातील रुग्णांना वेळीच आर्थिक मदत न मिळाल्याचे अखेरीस स्वयंसेवी खासगी संस्था तसेच क्राउड फण्डिंगच्या मदतीने रुग्णसेवा दिली जात असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
( हेही वाचा : सुमारे १० हजार चौ.मी. पेक्षा मोठ्या आकाराच्या भूखंडांवरील इमारत बांधकामात ‘मियावाकी वन’ बंधनकारक)
मुंबईत परळ येथील ग्लोबल या खासगी तसेच केईएम या पालिकेच्या रुग्णालयात हाताच्या प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया उपलब्ध आहे. ग्लोबल रुग्णालयात हाताच्या प्रत्यारोपणाचा अंदाजे खर्च २० लाखांपर्यंत आकारला जातो. केईएम रुग्णालयात केवळ ९ लाखांमध्ये हाताची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया उपलब्ध आहे. ग्लोबल रुग्णालयात आतापर्यंत ५ रुग्णांवर यशस्वीरित्या हाताची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली गेली. पाच रुग्णांपैकी दोन रुग्णांना मुख्यमंत्री साहाय्यता निधी मिळाला नसल्याची माहिती वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली. अखेरीस क्राउड फण्डिंग तसेच स्वयंसेवी संस्थांनी रुग्णांच्या शस्त्रक्रियांचा तसेच कायमस्वरुपी औषधांचा खर्च उचलला. हाताच्या प्रत्यारोपणाची पालिका तसेच खासगी क्षेत्रात ठराविक किंमत असावी, असे मत तज्ज्ञ व्यक्त करतात.
सध्या केईएम रुग्णालयात एका शेतमजूराला हाताच्या प्रत्यारोपणासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. दुसरीकडे ग्लोबल रुग्णालयात पाच रुग्णांनी हाताच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी नाव नोंदवले आहे. सहा रुग्णांसाठी अद्याप पुरेशी आर्थिक तजवीज झालेली नाही. १८ ते ६० वर्षादरम्यान गरजू रुग्णाला नवा हात शस्त्रक्रियेच्या माध्यमातून देता येतो. साठीनंतर आरोग्यांच्या समस्यांमुळे हाताच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेबाबत अडथळे निर्माण होतात. तरुणांना वेळीच नवे हात मिळाल्यास त्यांच्या आयुष्यातील परावलंबीत्व दूर होईल, अशी प्रतिक्रिया अवयवदान चळवळीतील कार्यकर्ते देतात.
हात गमावण्याचे कारण
- अपघातात हातांना होणारी जखम
- हाताला लागलेला वीजेचा धक्का
- अपघातात लागलेला मूका मार बराच काळ दूर्लक्षित केल्यास नव्या हाताची गरज भासू शकते
मुंबईत हाताच्या प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षायादीतील रुग्ण
केईएम रुग्णालय – १
ग्लोबल रुग्णालय – ५