मुंबईतील टँकर संपावर तातडीने तोडगा काढा; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचे महापालिका आयुक्तांना निर्देश

60
मुंबई प्रतिनिधी: 
Devendra Fadnavis : मुंबई वॉटर टँकर (Mumbai water tanker strike) असोसिएशनच्या संपामुळे शहरातील काही भागांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ऐन उन्हाळ्यात ही समस्या गंभीर बनत असल्याने सामान्य नागरिकांचा त्रास टाळण्यासाठी तातडीने तोडगा काढावा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation) आयुक्तांना दिले आहेत. टँकरचालकांच्या मागण्या आणि नवीन नियम यांच्यात सुवर्णमध्य साधत ही परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे आदेश त्यांनी दिले.

मुंबईत (Mumbai) सध्या जलाशयांमध्ये केवळ ३३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर काही भागांत पाणीकपात सुरू आहे, आणि नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत टँकरचालकांनी नवीन नियमांच्या विरोधात पुकारलेल्या संपामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. या संपाचा फटका झोपडपट्ट्या, मॉल्स, हॉटेल्स, रुग्णालये, मेट्रो आणि इमारत बांधकामांना बसत आहे. विशेषतः गैरपेयजलाची गरज असलेल्या प्रकल्पांना याचा मोठा त्रास होत आहे.

(हेही वाचा – जर ईडीला मूलभूत अधिकार असतील तर त्यांनी लोकांच्या हक्कांचाही विचार करावा ; Supreme Court पुन्हा ने फटकारले)

मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने (Mumbai Water Tanker Association) केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या (CGWA) नव्या नियमांना विरोध दर्शवत १० एप्रिलपासून बेमुदत संप सुरू केला आहे. या नियमांमध्ये प्रत्येक विहिरीभोवती २०० चौरस मीटर जागेची अट, फ्लो मीटर आणि जीपीएस ट्रॅकिंग यंत्रणा बसवण्याची सक्ती यांचा समावेश आहे. टँकरचालकांचे म्हणणे आहे की, मुंबईसारख्या दाट लोकवस्तीच्या शहरात या अटींचे पालन करणे अव्यवहार्य आहे. यामुळे त्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या समस्येची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना टँकरचालकांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या आणि नियमांमधील त्रुटींवर तोडगा काढण्याचे निर्देश दिले. “उन्हाळ्याच्या काळात पाणीटंचाईमुळे नागरिकांचा त्रास वाढता कामा नये. टँकरचालकांच्या मागण्यांचा विचार करत सामान्य जनतेला त्रास होणार नाही, याची खबरदारी घ्यावी,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

यापूर्वी २०२३ मध्येही टँकरचालकांनी असाच संप पुकारला होता. तेव्हा फडणवीस यांनी मध्यस्थी करून तो सोडवला होता. यंदाही त्यांनी तातडीने हस्तक्षेप करत महापालिकेला त्वरित पावले उचलण्यास सांगितले आहे. यामुळे लवकरच टँकरचालकांशी चर्चा होऊन हा संप मिटण्याची शक्यता आहे. तरीही, पाणीटंचाई आणि संपामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

या संपामुळे मुंबईतील पाणीपुरवठ्याच्या (Water shortage) समस्येवर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे. शहराला दररोज ४,२०० दशलक्ष लिटर पाण्याची गरज असताना, महापालिका केवळ ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करू शकते. यामुळे टँकर हा अनेक भागांसाठी पाण्याचा महत्त्वाचा स्रोत आहे. या समस्येचे मूळ शोधून दीर्घकालीन उपाययोजना करणे गरजेचे आहे, जेणेकरून भविष्यात अशी संकटे टाळता येतील. सध्या तरी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्देशांनुसार महापालिका आणि टँकरचालक यांच्यातील चर्चेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.