- विशेष प्रतिनिधी, मुंबई
धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्प (Costal Road) पूर्णपणे सुरक्षित असून या रस्त्यावर कोणतेही तडे वगैरे नाहीत. तसेच, रस्त्यांवर खड्डे देखील झालेले नाहीत. किनारी रस्त्यावर दिसणारे पट्टे (पॅचेस) हे मुळात खड्डे प्रतिबंधक उपाययोजना म्हणून टाकलेल्या मास्टिकच्या आवरणाचे आहेत. पावसाळ्यानंतर या मार्गांचे स्वरुप पूर्ववत करण्यात येईल, असे मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात येत आहे.
प्रकल्प पूर्णपणे सुरक्षित
धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्प (Costal Road) हा सर्वार्थाने सुरक्षित आहे. जागतिक स्तरावरील अनुभव असलेले सल्लागार, कंपनी यांच्याद्वारे सर्व पैलुंचा अभ्यास करुन या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला. सर्वोत्तम व आधुनिक तंत्रज्ञान वापरुन प्रकल्पाची बांधणी करण्यात आली आहे. सुरक्षित वाहतुकीशी संबंधित सर्व चाचण्या व मानके पूर्ण करुन वाहतुकीसाठी टप्प्याटप्प्याने मार्ग खुले करण्यात आले आहेत. एकूणच, या प्रकल्पावर कोणतेही खड्डे, तडे वगैरे नाहीत आणि वाहतुकीसाठी खुले करुन दिलेले मार्ग देखील सुस्थितीत आहेत.
(हेही वाचा – SRA Scheme : जुहू कोळीवाड्यातील झोपू योजना थांबविली, आमदार अमित साटम यांनी केली जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार)
उत्तरवाहिनी मार्गावर खड्डे प्रतिबंधक मास्टिक आवरण
मुंबई किनारी रस्ता अंतर्गत उत्तर दिशेने जाणारा मार्ग (चौपाटी ते वरळी) हा जुलै २०२४ मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यापूर्वी त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. तथापि, डांबरीकरण पूर्णपणे मजबूत रहावे, टिकावे यासाठी त्यावर मास्टिकचे अतिरिक्त आवरण ठिकठिकाणी टाकण्यात आले आहे. कारण पावसाळा सुरु झाल्यानंतर, सततच्या व जोरदार पावसामुळे डांबरीकरणाचे नुकसान होऊ नये, रस्त्यांवर खड्डे होवू नयेत, हा त्यामागचा हेतू आहे. याचाच अर्थ, अतिरिक्त उपाययोजना म्हणून मास्टिकचे आवरण अंथरले आहे. खड्डे निर्माण झालेले नाहीत, त्यामुळे बुजवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. (Costal Road)
वरळी ते चौपाटी या दक्षिणवाहिनी मार्गावर मास्टिकचे आवरण टाकलेले नाही, हे नागरिकांनी व प्रसारमाध्यमांनी कृपया लक्षात घ्यावे. कारण सदर दक्षिणवाहिनी मार्ग मार्च २०२४ मध्ये खुला करण्यात आला. परिणामी, त्यावरील डांबरीकरण पावसाळ्यापूर्वी मजबूत होण्यास पुरेसा अवधी मिळाला. त्यामुळे, प्रकल्पातील मार्ग बांधणीमध्ये कोणताही दोष नाही, हे सिद्ध होते.
वरळीच्या दिशेने उपलब्ध करुन दिलेला रस्ता हा तात्पुरता..
मुंबई किनारी रस्ता प्रकल्प वरळी-वांद्रे सागरी सेतूला जोडण्यासाठी दोन्ही तुळई (गर्डर) स्थापन करण्यात आल्या आहेत. त्यानंतरची कामे वेगाने सुरु आहेत. तथापि, ही कामे पूर्ण होईपर्यंत सागरी सेतूवर जाणाऱ्या वाहतुकीला सुलभता म्हणून पर्यायी मार्ग तयार करण्यात आला आहे. वरळी आंतरमार्गिकेच्या ठिकाणी, वरळीतील खान अब्दुल गफार खान मार्गावर जाण्यासाठी तात्पुरता रस्ता तयार करुन हा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. किनारी रस्त्यावरुन थेट सागरी सेतुवर प्रवेश खुला झाल्यानंतर या तात्पुरत्या रस्त्याची आवश्यकताच राहणार नाही. सबब, तात्पुरती व्यवस्था असलेल्या या मार्गाची मुख्य प्रकल्पाच्या बांधकामाच्या दर्जाशी तुलना करता येत नाही असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्प हा मुंबई व महाराष्ट्रासह देशाच्या पायाभूत सुविधांमधील आगळावेगळा मानदंड प्रस्थापित करणारा प्रकल्प आहे. त्याच्या अभियांत्रिकी बांधणीबाबत, बांधकाम दर्जाबाबत आणि एकूणच सुरक्षेबाबत कृपया कोणत्याही शंका बाळगू नयेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. (Costal Road)
हेही पहा – https://www.youtube.com/watch?v=GeXHEyiRFNw
Join Our WhatsApp Community