SRA : एसआरएच्या २२७ इमारतींना दरवर्षी फायर ऑडीट बंधनकारक

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांनी मंजूर केलेल्‍या २२७ इमारतींचे नियमित फायर ऑडीट करणे आवश्‍यक आहे.

232
SRA : एसआरएच्या २२७ इमारतींना दरवर्षी फायर ऑडीट बंधनकारक
SRA : एसआरएच्या २२७ इमारतींना दरवर्षी फायर ऑडीट बंधनकारक

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांनी मंजूर केलेल्‍या २२७ इमारतींचे नियमित फायर ऑडीट करणे आवश्‍यक आहे. हे फायर ऑडीट प्रत्‍येक वर्षी जून महिन्‍यात आग व जीवसुरक्षा लेखापरिक्षक यांच्‍यामार्फत विकासकाने तथा सोसायटीने स्‍वखर्चाने करणे आवश्‍यक आहे. परंतु, नव्‍याने बांधण्‍यात आलेल्‍या पुनर्वसन इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र देताना अग्निसुरक्षा उपकरणांचे व उपाययोजनांचे पूर्तता प्रमाणपत्र प्रथमतः प्रमुख अग्निशमन अधिकारी यांच्‍यामार्फत देण्‍यात यावे, अशी शिफारस गोरेगाव उन्नत नगर आग प्रकरणी नेमलेल्या आठ सदस्यीय समितीच्या अहवालात करण्यात आली आहे. (SRA)

उन्नत नगर, गोरेगाव (पश्चिम) जय भवानी एस. आर. ए. को-ऑपरेटिव्ह सोसायटी येथे लागलेल्या आगीत ७ जणांचा मृत्यू झाला होता. तर ५१ जण जखमी झाले होते. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन या प्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्याचे निर्देश महानगरपालिका प्रशासनाला दिले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार महानगरपालिका आयुक्त यांनी प्राथमिक चौकशी करून अहवाल सादर करण्यासाठीचे आदेश अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांना दिले होते. डॉ. सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली होती. समितीमध्ये महानगरपालिका अधिकारी, पोलीस, झोपडपट्टी पुनर्वसन, अग्निशमन अधिकारी, म्हाडा आदी प्राधिकरण आणि यंत्रणांच्या अधिकाऱ्यांचाही समावेश होता. प्राथमिक चौकशी अहवाल आठ सदस्यीय समितीने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांना सादर केला. त्यात भविष्यात आगीच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी समितीने उपाययोजना सुचविल्या आहेत. (SRA)

एसआरए इमारतीत स्पायरल लॅडरची उभारणी सक्तीची

त्यात मुंबई शहर व उपनगरे येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांच्‍या मान्‍यताप्राप्‍त इमारतीमधील तसेच भविष्‍यात बांधण्‍यात येणाऱ्या इमारतींमधील रहिवाशांना आगीच्‍या घटनेच्‍या वेळी सुरक्षितपणे इमारतींमधून बाहेर पडण्‍याच्‍या दृष्‍टीने प्रमुख अग्निशमन अधिकारी यांनी सुचविलेल्‍या ठिकाणी आवर्त शिडीची (Spiral Ladder) उभारणी करण्‍यात यावी. या शिडी सर्व ऋतूंमध्‍ये टिकण्‍याच्‍या दृष्‍टीने लोखंडाची न करता संपूर्ण शिडीची उभारणी रॉट आयर्नमध्‍ये करण्‍याची अट पुनर्वसन इमारतीच्‍या विकासकास मंजूरी देतेवेळी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांनी सक्‍तीची करावी. (SRA)

(हेही वाचा – Maratha Reservation : ओबीसीमधील आरक्षणाला धक्का न लावता आणि न्यायालयात टिकणारे आरक्षण देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार)

त्या इमारतीत फायर ऑडीटची जबाबदारी सोसायटीची

मुंबई महानगरपालिकेच्‍या कार्यक्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत प्रकल्‍पातील ज्‍या इमारतींसाठी भोगवटा प्रमाणपत्र निर्गमित करण्‍यात येऊन त्‍या साठीचा निधी (Corpus Fund) झोपडपट्टी पुनर्वसन इमारतीतील रहिवाश्‍यांच्‍या सोसायटीकडे जमा करण्‍यात आलेला आहे, अशा इमारतींची तपशीलवार यादी मुंबई महानगरपालिकेच्‍या प्रमुख अग्निशमन अधिकारी खात्‍यास देण्‍यात यावी, जेणेकरुन अशा इमारतींच्‍या सहकारी सोसायटी या संबंधितांना ‘महाराष्‍ट्र आगप्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम-२००६’ अनुसार, ‘प्रमुख अग्निशमन अधिकारी’ खात्‍याद्वारे नोटीस देऊन नोंदणीकृत ”आग व जीव सुरक्षा लेखापरिक्षक” यांच्‍याद्वारे ‘फायर ऑडीट करुन घेऊन’ त्‍यांनी निदर्शनास आणलेल्‍या आगप्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजनेतील त्रुटींची पूर्तता लायसन्‍सप्राप्‍त अभिकरणांमार्फत करण्‍यात यावे. (SRA)

अशा इमारतीतील फायर ऑडीटची जबाबदारी एसआरएची

ज्‍या पुनर्वसन इमारतींसाठी निधी (Corpus Fund) झोपडपट्टी पुनर्वसन इमारतीच्‍या रहिवाश्‍यांच्‍या सोसायटीकडे जमा करण्‍यात आलेला नाही अशा सर्व इमारतींसाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने नोंदणीकृत ”आग व जीव सुरक्षा लेखापरिक्षक” यांच्‍यामार्फत ‘फायर ऑडीट करुन घेऊन’ त्‍यांनी निदर्शनास आणलेल्‍या आगप्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजनेतील त्रुटींची पूर्तता लायसन्‍सप्राप्‍त अभिकरणांमार्फत तात्‍काळ करुन घेण्‍यात यावी. (SRA)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.