मुंबई अग्निशमन दलात भरती व्हायचंय? ‘या’ महिन्यापर्यंत करा प्रतीक्षा!

मुंबई अग्निशमन दलातील रिक्तपदांच्या भरतीकडे सर्वांचे लक्ष असून ही भरतीची जाहिरात कधी प्रसिध्द होईल आणि प्रत्यक्षात ही भरती केव्हा होईल असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे. मात्र, या भरतीची जाहिरात येत्या १५ सप्टेंबरनंतर प्रसिध्द होण्याची शक्यता आहे. त्यानंतर या अग्निशमन दलाच्या ९१० पदांकरता वॉक ईन इंटरव्ह्यू पध्दतीने अर्ज मागवून पात्र उमेदवारांची परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. ही पदे भरण्यासाठी प्रशासनाची मान्यता मिळाल्यानंतर तब्बल पावणे दोन वर्षांनी प्रत्यक्षात भरतीचा मार्ग खुला होणार आहे.

वॉक ईन इंटरव्ह्यू

मुंबई अग्निशमन दलातील अनेक पदे रिक्त असल्याने याचा ताण अग्निशमन दलावरील कर्मचाऱ्यांवर येत असल्याने यातील ९१० अग्निशामकांची पदे भरण्यासाठी नोव्हेंबर २०२०मध्ये मान्यता प्राप्त झाली होती. परंतु कोविडच्या निर्बंधामुळे या परीक्षा घेण्यात अडचणी येत होत्या. यापूर्वी २०१७मध्ये अग्निशमन दलातील जवानांच्या रिक्त पदांची भरती वॉक इन पध्दतीने भरल्या होत्या. त्यामुळे वॉक इन पध्दतीने या भरतीची प्रक्रीया राबववल्यास मोठ्याप्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. परिणामी कोविड निर्बंधाचे पालन होणार नसल्याने अग्निशमन दलाने ऑनलाईन पध्दतीने ही भरती राबवण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी ‘टीसीई’ सारख्या कंपनीची निवड करण्याचाही विचार होता. परंतु ही परीक्षा घेण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यामागे येणाऱ्या खर्चाच्या रकमेच्या तुलनेत संस्थेने अधिक रकमेची मागणी केली. त्यामुळे हा खर्च करणे शक्य नसल्याने अग्निशमन दलाने आता कोविडचे निर्बंध शिथिल झाल्याने पुन्हा ही निवडणूक वॉक इन पध्दतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या भरतीची प्रक्रीया राबवण्यासाठी अग्निशमन दलाने आता सामान्य प्रशासन विभागाला बिंदु नामावली ठरवण्यासाठी प्रस्ताव सादर केला असल्याची माहिती मिळत आहे.

अग्निशमन दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई अग्निशमन दलातील ९१० रिक्तपदाच्या भरतीची जाहिरात येत्या १५ सप्टेंबरनंतर प्रसिध्द होईल. त्यामध्ये आरक्षणनिहाय जवानांची भरती केली जाणार असून महिला जवानांची भरतीही आरक्षणानुसार जागा राखीव ठेवत केली जाणार आहे. कोविड निर्बंध हटवण्यात आल्याने आता ही भरतीची प्रक्रीया आता वॉक इन इंटरव्हयू पध्दतीने होणार आहे. गुणांच्या टक्केवारीनुसार टप्पे निश्चित करून त्याप्रमाणे परीक्षेसाठी बोलावले जाईल. यामध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य याप्रमाणेही भरती प्रक्रीया होणार आहे. यामध्ये निश्चित केलेल्या वेळेपर्यंत जे उमेदवार येतील त्यांनाच परीक्षेसाठी सामावून घेतले जाईल आणि त्यांची परीक्षा घेऊन त्यातून जवानांची निवड केली जाईल,असे त्यांनी स्पष्ट केले.

अग्निशमन दलाच्या या आवाहनाकडे द्या लक्ष

अग्निशमन दलाच्यावतीने भरण्यात येणाऱ्या पदांसाठी रितसर आणि अधिकृत जाहिरात ही वृत्तपत्रांमध्ये किंवा संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. त्याच जाहिरातीच्या आधारे पुढील भरतीची प्रक्रीया राबवली जाणार आहे. याव्यतिरिक्त कुठेही जाहिरात प्रसिध्द होणार नसून तशाप्रकारच्या अन्यठिकाणी जाहिरात प्रकाशित झाल्यास किंवा सोशल मिडियावरुन व्हायरल होत असेल तर त्यावर विश्वास ठेवला जावू नये,असे आवाहन मुंबई अग्निशमन दलाने केला आहे.

 

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here