आप्पा पाडा येथील आनंद नगरमधील झोपडपट्टीला आग लागून येथील सुमारे हजारांहून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या असून या बेघर झालेल्या या कुटुंबांची तात्पुरती व्यवस्था महापालिकेच्या पी उत्तर विभागाच्यावतीने बुवा साळवी मैदान, चैतन्य हॉल, महापालिका प्रसुतीगृहाच्या समोरच्या जागेत करण्यात आली आहे. वन जमिनीवरील या आगीच्या दुघर्टनेनंतर महापालिकेने मानवतेच्या दृष्टीकोनातून तात्पुरती राहण्याची व जेवण नाश्तासह कपड्यांची व्यवस्था केली असली तरी येथील सुमारे १ हजार कुटुंबांच्या पुनर्वसनाबाबत सरकार आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून निर्णय न घेतल्याने येथील कुटुंबांची चिंता अधिकच वाढली आहे.
( हेही वाचा : ठाणेकरांनो लक्ष द्या! २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद)
अप्पा पाडा आनंद नगर येथील झोपडपट्टीला सोमवारी दुपारी चारच्या सुमारास आग लागून येथील सुमारे एक हजारांहून अधिक झोपड्या आगीच्या भस्मस्थानी पडल्या. या आगीच्या दुघर्टनेनंतर येथील कुटुंबांची तात्पुरती व्यवस्था जवळच्या मैदानात करण्यात आली आहे. त्यामुळे यांच्या भोजनासह नाश्ताची व्यवस्था महापालिकेच्या पी उत्तर विभागाच्यावतीने करण्यात आली आहे. याशिवाय आरोग्य केंद्राचीही व्यवस्था केली आहे. महापालिकेच्यावतीने ही तात्पुरती सेवा पुरवली जात असली तरी या कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न कायमच आहे.
वन जमिन असल्याने या कुटुंबांच्या पुनर्वसनाची जबाबदारी ही सरकार आणि जिल्हाधिकारी यांची आहे. त्यामुळे यासर्व जागेचे पंचनामे सध्या सुरु असून या आगीच्या घटनेनंतर कुटुंबांना नुकसान भरपाई किंवा पुनर्वसनाबाबत सरकारच्यावतीने कोणत्याही प्रकारची घोषणा करण्यात आलेली नाही.
महापालिकेच्या पी उत्तर विभागाच्या सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी यामध्ये सुमारे ७५० घरांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती असल्याचे सांगितले. सध्या महापालिकेच्यावतीने तात्पुरती व्यवस्था करून कुटुंबांना जेवणासह इतर मदत पुरवली जात आहे. तसेच आरोग्याची सुविधाही पुरवली असल्याचे त्यांनी सांगितले. तर माजी नगरसेविका धनश्री भरडकर यांनी आतापर्यंत १०६० घरांचे पंचनामे झाल्याचे सांगून महापालिकेच्यावतीने तात्पुरती व्यवस्था केली आहे. परंतु या कुटुंबांच्या पुनर्वसनाचा मुख्य मुद्दा असून त्यांचे पुनर्वसन योग्य जागी व्हावे अशी मागणी त्यांनी केली. एक हजारांहून अधिक झोपड्या जळून खाक झाल्याने बेघर झालेल्या कुटुंबातील सदस्यांच्या निवाऱ्यासह कपडे आणि मुलांच्या शिक्षणाचाही मूळ मुद्दा आहे. त्यामुळे शासन योग्य तो निर्णय घेऊन या गरीब कुटुंबांना न्याय देतील असा विश्वास शिवसेनेचे वैभव भरडकर यांनी व्यक्त केला आहे.