नागपुरात कोट्यवधी रुपयांची लाल मिरची जळून खाक, बाजार समिती परिसरात भीषण आग

नागपूर येथील कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात मंगळवारी मध्यरात्री भीषण अग्नितांडव झाले. या आगीमुळे एका शेडमध्ये ठेवलेली कोट्यवधी रुपयांची लाल मिरची जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे शेतक-यांचं आणि व्यापा-यांचं मोठं नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

लाल मिरचीच्या शेडला आग

मंगळवारी मध्यरात्री 2च्या सुमारास कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात ही आग लागली. या आगीचा फटका एका शेडमध्ये असलेल्या लाल मिरचीच्या पोत्यांना देखील बसला. आगीमुळे ही मिरची संपूर्णपणे जळून खाक झाली आहे. अग्निशमन दलाच्या प्रयत्नानंतर काही तासांत ही आग विझवण्यात आली आहे. पण या आगीच्या घटनेमुळे शेतकरी आणि व्यापा-यांनी बाजार समिती प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी आणि व्यापा-यांकडून करण्यात येत आहे.

संचालक मंडळाची मागणी

अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचेपर्यंत आग चांगलीच भडकली होती. दरम्यान, आगीचे ठोस कारण अजून सांगण्यात येत नसले तरी आग लागलेल्या शेडमध्ये इलेक्ट्रिसीटीचे काम अर्धवट राहिल्यामुळे तिथे झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीत लाल मिरच्यांनी भरलेली चार ते पाच हजार पोती जळून खाक झाली असल्याचे संचालक मंडळाच्या सदस्यांचे म्हणणे आहे. तसेच आगीमुळे झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी व्यापारी आणि शेतक-यांना भरपाई देण्यात यावी, अशीही मागणी संचालक मंडळाच्या सदस्यांनी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here