- विशेष प्रतिनिधी, मुंबई
यंदाच्या दिपावलीत ध्वनी विरहित फटाक्यांचा वापर करण्यास प्राधान्य देऊन कमीत कमी वायू व ध्वनी प्रदूषण करणारे फटाके फोडावेत. फटाके फोडण्याची वेळ रात्री १०.०० वाजेपर्यंत मर्यादित ठेवावी, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे दिवाळीच्या शुभेच्छांसह करण्यात येत आहे. (Firecrackers)
प्रकाशाचा सण, सणांचा राजा, दीपोत्सव अशी ओळख असणारा दिवाळीचा सण मुंबईकरांनी अधिकाधिक पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा. तसेच दिवे लावताना व फटाके फोडताना आपल्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, विशेष करून लहान मुलांची जास्त काळजी घ्यावी. फटाक्यांची आतषबाजीमुळे वायू व ध्वनी प्रदूषण होते. प्रदूषणास प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेतल्यास दिवाळीचा आनंद अधिक चांगल्या रितीने, अधिक संस्मरणीय पद्धतीने घेता येईल. (Firecrackers)
(हेही वाचा – Hyderabad Fire : बेकायदेशीर फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग; एक महिला जखमी)
प्रदूषण नियंत्रणासंदर्भात महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने दीपावली सणामध्ये नागरिकांनी फटाके फोडण्याची वेळ रात्री १०.०० वाजेपर्यंत मर्यादित ठेवावी. त्यातही शक्यतो कमीत कमी वायू व ध्वनी प्रदूषण करणारे फटाके फोडावेत. फटाक्यांच्या प्रदूषित हवेमुळे लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध व्यक्ती, दम्यासारख्या आजाराचे रुग्ण अशा सर्वांनाच आरोग्याचा त्रास होतो. त्यासोबतच, पर्यावरणाचे देखील नुकसान होते, ही बाब देखील सर्वांनी कृपया लक्षात घ्यावी, असे ही आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. (Firecrackers)
याच बाबी लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे पुढीलप्रमाणे सूचनावजा आवाहन करण्यात येत आहे
१. दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे. तो प्रकाशासोबत साजरा करण्यास प्राधान्य देवून ध्वनी व वायू प्रदूषण टाळावे.
२. ध्वनी विरहित फटाक्यांचा वापर करण्यास प्राधान्य द्यावे.
३. कमीत कमी वायू प्रदूषण करणारे फटाके फोडावेत..
४. फटाके फोडण्याची वेळ रात्री १०.०० वाजेपर्यंत मर्यादित ठेवावी.
५. ज्येष्ठ नागरिक व हृदयरुग्णांप्रती जबाबदारी जाणून तीव्र आवाजाचे फटाके फोडणे टाळावे.
६. सुरक्षिततेस सर्वोच्च महत्व द्यावे.
७. फटाके फोडताना शक्यतो सूती कपडे परिधान करावेत. सैलसर (Oversized) कपडे वापरू नयेत.
८. फटाके फोडताना ते मोकळ्या जागी फोडावेत.
९. गर्दीची ठिकाणे, अरूंद गल्ली यांसारख्या ठिकाणी फटाके फोडू नयेत.
१०. फटाके फोडताना मुलांसोबत मोठ्या व्यक्तींनी सोबत रहावे.
११. फटाके फोडताना सुरक्षिततेचा भाग म्हणून पाण्याने भरलेली बादली, वाळू इत्यादी बाबी जवळ बाळगाव्यात.
१२. फटाके फोडताना कोरडी पाने, कागद किंवा कोणतीही इतर सामुग्री जाळू नये.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community