मोसमातील पहिला हापूस आंबा हे सर्वांसाठी कुतूहलाचा विषय असतो, कोणत्या शेतकऱ्याची पहिली हापूस आंब्याची पेटी बाजारात आली, तिला किती दर मिळाला, हे सर्वांनाच जाणून घ्यायचे असते. यंदाच्या मोसमातील हापूस आंब्याची पहिली पेटी वाशी मार्केटमध्ये दाखल झाली. देवगडमधील कातवण गावाचे शेतकरी दिनेश शिंदे आणि प्रशांत शिंदे या शेतकऱ्यांनी ही पेटी पाठवली आहे. २ डझन हापूस आंब्याच्या पेटली ९ हजार रुपयांचा दार मिळाला आहे.
पहिली पेटी सिद्धीविनायकाच्या चरणी
नवी मुंबईतील वाशीतील एपीएमसी मार्केटमधील प्रसिद्ध आंबा व्यापारी अशोक हांडे यांच्याकडे शुक्रवारी, 25 नोव्हेंबर रोजी कोकणातील देवगडचा हापूस आंबा दाखल झाला आहे. आंबा मोसमाची आलेली पहिली पेटी अशोक हांडे यांच्याकडून मुंबईतील प्रसिद्ध सिद्धीविनायक चरणी अर्पण करण्यात येणार आहे. यावर्षी पाऊस उशिरापर्यंत राहिल्याने थंडी पडायला वेळ लागला. याचा परिणाम हापूस आंब्याच्या मोहोरावर झाला आहे. मोहोर येण्यास कालावधी लागल्याने या वर्षी हापूस आंब्याचा मुख्य सीझन मार्चऐवजी एप्रिल महिन्यात सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मार्गशीर्ष महिन्याच्या मुहूर्ताला आंबा रवाना
मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारचा मुहूर्त साधून दोन डझन आंब्याची पहिली पेटी वाशी मार्केटला रवाना करण्यात आली. हंगामातील पहिला आंबा हा मुहूर्ताचा आंबा मानला जातो. त्यामुळे या आंब्याची विधिवत पूजा करुन संपूर्ण हंगाम चांगला जाऊ दे अशी प्रार्थनाही केली जाते. अगदी पूर्वीपासून चालत आलेली ही परंपरा आजच्या बागायतदारांसह व्यापाऱ्यांनीही कायम ठेवली आहे.
Join Our WhatsApp Community