भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतरचा पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. मुंबईतील षण्मुखानंद सभागृह येथे २४ एप्रिलला आयोजित सोहळ्यात मोदी यांना सन्मानित करण्यात येणार आहे. दरवर्षी देशहित आणि समाजहितासाठी काम करणाऱ्या एका व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. दरम्यान पंतप्रधानांनी पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहण्यास अनुकुलता दर्शवली आहे, अशी माहिती उषा मंगेशकर यांनी दिली आहे.
(हेही वाचाः विद्यार्थ्यांनो… जाणून घ्या UGC NET परीक्षा कधी होणार?)
दिदींच्या नावाला शोभेल असा पुरस्कारार्थी हवा
पुरस्काराविषयी बोलताना पं. ह्रदयनाथ मंगेशकर म्हणाले की, प्रत्येक क्षेत्रातील दिग्गजांना लता दिनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर यांसारख्या व्यक्तींनाही हा पुरस्कार दिला जाईल. दिदींच्या ओळखीचा आणि दिदींच्या नावाला शोभेल असा पुरस्कारार्थी असायला हवा. १५ वर्षांपूर्वी आम्ही दिनानाथ मंगेशकर नवं रुग्णालय बांधलं होतं, तेव्हा नरेंद्र मोदींनी या हॉस्पिटलचं उद्घाटन केलं होतं. तेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी भाषणात लता दिदींनी नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली होती.
दिदींच्या सांगितीक कारकिर्दीला ८० वर्षे पूर्ण
ते पुढे म्हणाले, आम्ही लता दीदींच्या फोटोला हार घालत नाही, केवळ फुले वाहतो. मास्टर दिनानाथ मंगेशकरांच्या पुण्यतिथीला ८० वर्षे पूर्ण होत आहेत. दिदींच्या सांगितीक कारकिर्दीला देखील ८० वर्षे पूर्ण होत आहेत. २४ एप्रिलला लता दिनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचा फलक देखील लागणार आहे.
(हेही वाचाः ‘वारं खूप सुटलंय…’, मनसेच्या टीझरमध्ये बाळासाहेबांची गर्जना!)
भारताची गान कोकिळा लता मंगेशकर यांचे ६ फेब्रुवारी रोजी निधन झाले होते. त्या ९२ वर्षांच्या होत्या. दिदींना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्या दरम्यान ६ फेब्रुवारी रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, लता मंगेशकरांच्या निधनानंतर हा पहिलाच पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
Join Our WhatsApp Community